Today Top 10 Headlines in Marathi: कोकण-विदर्भाला यलो अलर्ट ते भाजपची हायव्होल्टेज बैठक; वाचा सकाळच्या दहा हेडलाईन्स

१. पुढील ५ दिवस महत्त्वाचे, कोकण-विदर्भाला यलो अलर्ट

राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झालेला पाहायला मिळत आहेत. मान्सूनने यंदा वेळेपूर्वीच राज्यात प्रवेश केला. मात्र, त्यानंतर पावसाला ब्रेक लागला. आठवडाभर विश्रांती घेतल्यानंतर आता मान्सून राज्यात पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. अरबी समुद्रात मोसमी वारे वाहू लागल्याने पावसाला पोषक असं वातावरण निर्माण झाल्याने मुसळधार पाऊस बरसण्याची चिन्ह आहेत. येत्या ४८ तासात राज्यात अनेक ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळतील असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

२. भाजपची हायव्होल्टेज बैठक, कॅबिनेट विस्ताराबाबत चर्चेची चिन्हं

भारतीय जनता पक्षाची कोअर कमिटीची बैठक दिल्लीत मंगळवारी सायंकाळी होणार असून, त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, सुधीर मनगुंटीवार आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार आहेत. फडणवीस यांचा राजीनामा आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या विस्तारामध्ये पुण्याला आणखी एखादे मंत्रिपद मिळू शकते. अधिक बातमी सविस्तर वाचा

३. विधानसभेचं जागावाटप कशाच्या आधारे? महाविकास आघाडीचा निकष ठरला

लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष विधानसभा निवडणूक एकत्र लढणार असल्याची घोषणा नुकतीच करण्यात आली. यासाठी जागावाटपाचे सूत्र ठरविण्यात येणार आहे. याशिवाय निवडणुकीचा जाहीरनामा सर्व घटकांना न्याय देणारा असावा व लवकरात लवकर जाहीर व्हावा, याकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे, अशी माहिती आघाडीतील सूत्रांकडून देण्यात आली. महाविकास आघाडीकडून संयुक्त जाहीरमाना प्रकाशित करण्यात येणार आहे. यासाठी लवकरच सर्व पक्षांतील सदस्यांची एक समिती तयार करण्यात येईल, असे आघाडीतील एका ज्येष्ठ नेत्याने ‘मटा’शी बोलताना दिली.

४. वेगळा निर्णय घेण्याचं ओबीसी कार्यकर्त्यांचे आवाहन

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले काही दिवस अस्वस्थ असलेल्या छगन भुजबळ यांच्या भावनांना सोमवारी समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी जाहीर वाचा फोडली. सातत्याने डावलले जाण्यापेक्षा वेगळा निर्णय घ्या, अशी आग्रही भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली. त्यामुळे भुजबळ काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

५. मुलींना मोफत शिक्षण, घोषणा हवेतच विरली, अमित ठाकरेंचं

आठ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या पालकांच्या मुलींना इंजिनीअरिंग आणि मेडिकल शिक्षणासह अन्य ६४२पेक्षा अधिक अभ्यासक्रमांचे शिक्षण मोफत दिले जाईल, अशी घोषणा राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी केली होती. मात्र या घोषणेबाबत अद्याप शासन निर्णय जाहीर झालेला नाही. याचा राज्यातील जवळपास २० लाखांहून अधिक विद्यार्थिनींना फटका बसण्याची शक्यता आहे, असे सांगत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी सोमवारी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे दाद मागितली आहे. अधिक बातमी सविस्तर वाचा

६. वाघनखे जुलैमध्ये येणार, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल खानाला मारताना वापरलेली वाघनखे लवकरच भारतात येणार आहे. या संदर्भात असलेला आचारसंहितेचा अडथळा दूर झाला असून, जुलै महिन्यात वाघनखे भारतात आणण्यात येतील, अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी दिली. लंडन येथील ‘व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम’मध्ये असलेली ही वाघनखे तीन वर्षांसाठी भारतात आणली जाणार आहेत.

७. कार दरीत कोसळून २३ वर्षीय तरुणीचा मृत्यू

श्वेता दीपक सुरवसे (वय २३, रा. हनुमाननगर, छत्रपती संभाजीनगर) असे मृत तरुणीचे नाव आहे. श्वेता सुलीभंजन परिसरातील दत्तधाम मंदिर येथे गेली होती. त्या वेळी कार चालवत असताना, रील तयार करायचा होता. शिवराज संजय मुळे हा चित्रीकरण करत होता. कार चालवण्याच्या प्रयत्नात तिच्या हातून रिव्हर्स गिअर पडला आणि पाय एक्सलेटरवर पडल्यामुळे कार वेगात पाठीमागे गेली आणि डोंगरावरून खोल दरीत कोसळली. अधिक बातमी सविस्तर वाचा

८. ‘कहो ना प्यार है’च्या यशानंतर राकेश रोशनवरही…

एप्रिल महिन्यात सलमान खानच्या घरावर गोळीबार झाला होता, त्यानंतर गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईने सोशल मीडियावर पोस्टर लिहून गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली होती. या प्रकरणाचा तपास अजूनही सुरू आहे. असाच काहीसा प्रकार हृतिक रोशनच्या ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटाच्या जबरदस्त यशानंतरही घडला होता.

९.

भारतीय संघाला मोठा धक्का

भारतीय संघाने टी-२० वर्ल्डकप २०२४च्या सुपर-८ मध्ये प्रवेश केला आहे. आता या फेरीतील संघाचा पहिला सामना २० जून रोजी बार्बाडोस येथे अफगाणिस्तानशी होणार आहे. भारतीय संघाने आता पर्यंत तीन सामने खेळले असून तिन्ही सामने जिंकले आहे तर एक सामना पावसामुळे वाहून गेला आहे. सुपर-८ मध्ये पोहोचल्यानंतर भारतीय संघ कशी कामगिरी करतो यावर सगळ्यांचे लक्ष असणार आहे. आता सुपर-८ मधील प्रवास खडतर होऊ शकतो कारण भारतीय संघातील एक महत्वाचा फलंदाजाला दुखापत झाल्याने तो पुढील सामने खेळेल की नाही यात शंका आहे.

१०. शेअर मार्केटमध्ये यशस्वी ट्रेडर व्हायचंय?

शेअर बाजारात गुंतवणुकीचा कल दिवसेंदिवस वाढत आहे. तरुण असो किंवा नुकतेच नोकरीला लागलेले पगारदार, प्रत्येकजण बाजारात गुंतवणूक करून फायदा घेण्यासाठी आतुर असतो. शेअर बाजारात भरपूर पैसा आहे असं म्हणतात, परंतु जोखीमही तितकेच आहे. होय, बाजारातील गुंतवणुकीवर अनिश्चित परतावा मिळतो, त्यामुळे सकारात्मक रिटर्न्स हवे असतील तर संयम ठेवणे आवश्यक आहे. इक्विटी मार्केटमध्ये घसरणीच्या काळात खरेदीची संधी निर्माण होते आणि अचानक बाजार जेव्हा खाली येतो तेव्हा अनेकजण शेअर्स खरेदी करतात.