‘त्यांचा ‘यूटी’ आहे असं म्हणू का? मला जास्त…’ उद्धव ठाकरेंच्या ‘एसंशी’ शॉर्टफॉर्मला शिंदेकडून जशास तसं उत्तर!

Eknath Shinde : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज (3 एप्रिल) पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर सडकून टीका केली. त्यांनी वक्फ विधेयकाच्या (Waqf Board Amendment Bill) मुद्द्यावरून मोदी सरकारला घेरलंय. विधेयकात काही चांगल्या गोष्टी आहेत. पण आमचा ढोंगीपणाला विरोध आहे, असं ठाकरे म्हणाले आहेत. तसेच त्यांनी पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांचा एसंशी असा उल्लेख करत टीका केली. त्यांच्या याच टीकेवर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही जशास तसं उत्तर दिलं आहे.

मला बोलायला लावू नका, माझ्याकडे भरपूर…

एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी बोलतांना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याव वक्फ दुरुस्ती विधेयकाच्या भूमिकावरही प्रश्नचिन्ह उपस्थितं केलं. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे हे तुमचा उल्लेख ‘एसंशी’ असा करत आहेत. तसेच सातत्याने गद्दार-गद्दार म्हणत आहेत, त्यावर तुमचं मत काय आहे? असं विचारलं. याला उत्तर म्हणून “मी त्यांचा ‘यूटी’ म्हणजेच यूज अँड थ्रो आहे असं म्हणू का? वापरा आणि फेकून द्या, असं म्हणू का? त्यांची तशीच नीती आहे. मला बोलायला लावू नका. माझ्याकडे भरपूर काही आहे. मी शांत आहे. मला शांतपणे काम करू द्या,” असा इशारा शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना दिला.

गद्दार कोण आणि खुद्दार कोण याचा फैसला…

तुम्ही मला गद्दार म्हणून हिणवलं. खोके-खोके म्हणून टीका केली. मात्र महाराष्ट्रातील जनतेमे तुम्हालाच खोक्यात बंद केलं. त्यांनी 100 जागा लढवल्या आणि 20 जागा जिंकल्या. आम्ही 80 जागा लढवल्या आणि आमचा 60 जागांवर विजय मिळवला. महाराष्ट्रातील जनतेने गद्दार कोण आणि खुद्दार कोण याचा फैसला गेल्या विधानसभा निवडणुकीत केला आहे,’ असं सणसणीत प्रत्युत्तरही शिंदे यांनी ठाकरे यांना दिले.

आता विधेयक राज्यसभेत जाणार

दरम्यान, आता वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आले आहे. आता हे विधेयक राज्यसभेत पाठवले जाणार आहे. त्यानंतर राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर या विधेयकाचे कायद्यात रुपांतर होईल. त्यानंतर या विधेयकातील तरतुदींची अंमलबजावणी केली जाईल.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)