Mumbai Local: लाखो मुंबईकरांसाठी लोकल प्रवास नित्याचा आहे. लोकलमधील गर्दीत उन्हाळ्यात घामाघूम होत मुंबईकर घर ते कार्यालयात दाखल होत असतात. परंतु वाढत्या उष्णतेमुळे त्रस्त झालेल्या मुंबईकरांचा लोकल प्रवास आता अधिक गारेगार होणार आहे. मध्य रेल्वेने याबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे. वाढत्या उकाड्याच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेवर बुधवारपासून ८० वातानुकूलित लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहे. त्याचा फायदा हजारो मुंबईकरांना होणार आहे. त्यांचा प्रवास सुखद अन् गारेगार होणार आहे.
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर वाढीव १४ वातानुकूलित लोकल सुरू करण्यात येणार आहे. यामुळे १६ एप्रिलनंतर वातानुकूलित लोकल फेऱ्यांची संख्या ६६ वरून ८० होणार आहे. वाढत्या उष्ण वातावरणात प्रवाशांना अधिक आरामदायी प्रवासाचा अनुभव देण्यासाठी मध्य रेल्वेने ही सुविधा सुरू केली आहे. मध्य रेल्वेने एसी लोकल फेऱ्या वाढवल्या असल्या तरी पश्चिम रेल्वेने अद्याप याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही.
सध्या मध्य रेल्वेच्या मुख्य मार्ग, हार्बर मार्ग, ट्रान्स-हार्बर मार्ग आणि बेलापूर-उरण कॉरिडॉर, नेरूळ-उरण पोर्ट मार्गिकेवरून सुमारे दररोज १,८१० लोकल फेऱ्या धावतात. त्यात कोणतीही वाढ केली नाही. परंतु १४ सामान्य लोकलच्या वेळेत वातानुकूलित लोकल चालवण्यात येणार आहे. या वातानुकूलित लोकल फेऱ्या सोमवार ते शनिवारपर्यंत धावतील. रविवार आणि सुट्टीच्या दिवशी वातानुकूलितऐवजी सामान्य लोकल धावणार आहेत.
या लोकल आता एसी
सकाळी ७.३४ कल्याण-सीएसएमटी, सकाळी १०.४२ बदलापूर-सीएसएमटी, दुपारी १.२८ ठाणे-सीएसएमटी, दुपारी ३.३६ ठाणे-सीएसएमटी, सायंकाळी ५.४१ ठाणे-सीएसएमटी, रात्री ९.४९ ठाणे-सीएसएमटी, रात्री ११.०४ बदलापूर-ठाणे अशा अप मार्गावरील लोकल फेऱ्या आता एसी लोकल म्हणून धावणार आहेत.
तसेच डाउन मार्गावरील पहाटे ६.२६ विद्याविहार ते कल्याण, सकाळी ९.०९ सीएसएमटी ते बदलापूर, दुपारी १२.२४ सीएसएमटी ते ठाणे, दुपारी २.२९ सीएसएमटी-ठाणे, दुपारी ४.३८ सीएसएमटी ते ठाणे, सायंकाळी ६.४५ सीएसएमटी ते ठाणे आणि रात्री ९.०८ सीएसएमटी ते बदलापूर या लोकलचे एसी लोकलमध्ये रुपांतर केले आहे.