हे स्थळ आम्हाला राष्ट्रसेवेसाठी प्रेरणा देतं… पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संघ स्मृती मंदिरातील संदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. नागपुरातील नेत्र संस्थान आणि अनुसंसाधन केंद्राच्या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरचा शिलान्यास पंतप्रधानांच्या हस्ते होत आहे. या कार्यक्रमासाठी मोदी नागपुरात आले आहेत. नागपुरात आल्यावर त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघ मंदिराला भेट दिली. यावेळी त्यांनी संघाचे पहिले संस्थापक केशव बळीराम हेडगेवार यांच्या समाधीचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी तिथे असलेल्या नोंदवहीत संदेश लिहिला आहे. हे स्थळ आम्हाला राष्ट्रसेवेसाठी कायम प्रेरणा देतं, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर मोदी थेट संघाच्या संघ स्मृती मंदिरात गेले. याठिकाणी त्यांनी डॉ. हेडगेवार यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. त्यानंतर त्यांनी दीक्षाभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्धांच्या मूर्तीला अभिवादन केलं. पंतप्रधान म्हणून मोदी दुसऱ्यांदा दीक्षाभूमीवर आले आहेत. सलग दोन वेळा दीक्षाभूमीवर येणारे मोदी हे एकमेव पंतप्रधान आहेत.

10 मिनिटे चर्चा

मोदी संघ कार्यालयात आले. तेव्हा त्यांनी संघाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशीही त्यांनी संवाद साधला. मोदी तब्बल 10 मिनिटे संघ कार्यालयात होते. त्यानंतर त्यांचा ताफा दीक्षाभूमीच्या दिशेने निघाला. रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या नागपूरकरांना अभिवादन करतच मोदींचा ताफा निघाला होता.

modi massage

मोदींचा संदेश काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संघ स्मृती मंदिरात हेडगेवारांना अभिवादन केल्यानंतर तिथल्या नोंद वहीत संदेश लिहिला आहे. मोदी म्हणतात…

“परम पूजनीय डॉ. हेडगेवार जी आणि पूज्य गुरुजींना माझा भावपूर्ण नमस्कार. त्यांच्या स्मृतींना वंदन करतो. या स्मृती मंदिरात येऊन मी भारावून गेलो आहे. भारतीय संस्कृती, शब्दातीत आणि संघटित मूल्यांना समर्पित हे स्थळ राष्ट्रसेवेसाठी पुढे येण्याची प्रेरणा देते. संस्थेच्या दोन मजबूत स्तंभांनी देशाच्या सेवेसाठी समर्पित केलेल्या स्वयंसेवकांसाठी ही ऊर्जा देणारी जागा आहे.

आमच्या प्रयत्नांमुळे भारत मातेचा गौरव नेहमीच वाढत राहो!”

नरेंद्र मोदी
पंतप्रधान, भारत सरकार

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)