जम्मू काश्मीरमच्या पहलगाममध्ये मंगळवारी मोठा दहशतवादी हल्ला झाला, पोलिसांच्या वेशात आलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या हल्ल्यामध्ये 26 जणांचा बळी गेला. मृतांमध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे. या घटनेत डोंबिवलीमधील तिघांचा मृत्यू झाला आहे.संजय लेले, हेमंत जोशी आणि अतुल मोने अशी या हल्ल्यामध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावं आहेत. ते आपल्या कुटुंबासोबत पर्यटनासाठी जम्मू काश्मीरला गेले होते. मात्र या दुर्दैवी घटनेत त्यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान त्यांच्या कुटुंबीयांनी गुरुवारी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आहे. त्यावेळी त्यांनी नेमकी घटना कशी घडली? त्याबद्दल माहिती दिली. सर्व अतिरेक्यांना ठार करा, ‘शूट एट साइट’चे आदेश द्या, अशी मागणी कुटुंबीयांकडून करण्यात आली आहे. या घटनेत मृत्यू झालेल्या संजय लेले यांचा मुलगा ही घटना सांगताना चांगलाच भावुक झाला. त्याला पत्रकार परिषदेमध्ये अश्रू अनावर झाले.
इथे हिंदू कोण आहेत? मुस्लीम कोण आहेत, अशी आम्हाला हल्लेखोरांकडून विचारणा झाली.त्यानंतर हल्लेखोरांनी गोळीबार केला. माझा हात बाबांच्या डोक्यावर होता, ते रक्तबंबाळ झाले होते.काय करावं काही कळत नव्हतं. तुम्ही इथून जा, तुमचा जीव वाचवा असं तेथील काही स्थानिक लोकांनी आम्हाला सांगितलं. आम्ही तेथून निघालो, काही लोक घोड्यावर होते, तर काही लोक पायी चालत होते. त्यानंतर काही वेळाने मला ओळख पटवण्यासाठी तिथे नेण्यात आलं. सर्व अतिरेक्यांना ठार करा, ‘शूट एट साइट’चे आदेश द्यावेत अशी मागणी हर्षद लेले यांनी केली आहे. या दहशतवाद्यांनी ब्राऊन कलरचे कपडे घातलेले होते, आपण एखाद्या पिक्चरमध्ये पाहातो तसे ते दिसत होते. ते मिलिटरी वाले वाटत नव्हते, असंही हर्षद लेले यांनी म्हटलं आहे.
दरम्यान या हल्ल्यानंतर आता भारत सरकारनं पाकिस्तानविरोधात मोठी कारवाई केली आहे. सिंधु पाणी वाटप कराराला स्थगिती देण्यात आली आहे. एवढंच नाही तर अटारी बॉर्डर देखील बंद करण्यात आली आहे, पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा देखील मिळणार नाहीये. पाकिस्तानी नागरिकांनी पुढील 48 तासांमध्ये भारत सोडावा असे आदेश देखील देण्यात आले आहेत.