डासांपासून होणाऱ्या आजारांपासून आपल्या आरोग्याचे रक्षण अत्यंत आवश्यक असते. डासांपासून सुटका मिळवण्यासाठी अनेकजण कॉइलचा वापर करतात, परंतु काही लोकांना त्याच्या धुरामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो किंवा डोळ्यांना जळजळ होऊ लागते. खरं तर, बाजारात उपलब्ध असलेल्या बहुतेक डास प्रतिबंधक उत्पादनांमध्ये अशी रसायने वापरली जातात जी आरोग्यासाठी चांगली नसतात. जर तुम्हालाही कॉइल्सची समस्या असेल किंवा रासायनिक उत्पादने वापरायची नसतील, तर घरात ठेवलेल्या कोणत्या गोष्टी डासांना दूर ठेवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात हे जाणून घ्या.
तुम्ही जर बाजारात उपलब्ध असलेल्या डास प्रतिबंधक उत्पादनांऐवजी नैसर्गिक गोष्टी वापरल्या तर आरोग्याच्या समस्या होण्याची शक्यता खूप कमी असते. डासांव्यतिरिक्त, इतर कीटक देखील या गोष्टींमुळे पळून जातात. डासांना दूर ठेवण्यासाठी तुम्ही कोणत्या गोष्टी वापरू शकता ते आपण आजच्या लेखातुन जाणून घेऊयात.
तमालपत्र आणि कापूर
डासांना घरापासून दूर ठेवण्यासाठी तुम्ही तमालपत्र आणि कापूर वापरू शकता. त्याचा वासाने डास पळून जातात. तुम्ही यात शेणाच्या गोवऱ्या घेऊन त्यावर कापूर आणि तमालपत्र ठेवा. आणि ते जाळा. त्याचा धूर डास आणि इतर कीटकांना दूर पळवतो.
सुकलेली कडुलिंबाची पाने
कीटकांपासून मुक्तता असो, त्वचेपासून मुक्तता असो किंवा आरोग्याशी संबंधित समस्या असोत, कडुलिंब ही अशी एक वनस्पती आहे ज्याची पाने, फळे आपल्यासाठी सर्व उपयुक्त आहेत. डासांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही कडुलिंबाची पाने जाळू शकता. यामुळे घरात असलेले उर्वरित बॅक्टेरिया देखील नष्ट होतात.
लवंग आणि लिंबू
डासांना घरापासून दूर ठेवण्यासाठी लवंग आणि लिंबू देखील खूप प्रभावी आहेत. लिंबू दोन भागांमध्ये कापून घ्या आणि नंतर त्यात लवंगा ठेवा. हे लिंबू कोपऱ्यात, खिडकीच्या चौकटीत इत्यादी ठिकाणी ठेवा, जेणेकरून डास यांच्या वासाने पळून जातील.
कांदा व लसूणाची साले
कांदा आणि लसूणची साले डासांना दूर ठेवण्यासाठी खूप उपयुक्त आहेत कारण त्यांचा वास तीव्र असतो. साले फेकून देण्याऐवजी, ती वाळवा आणि घरात जेव्हा डास येतात तेव्हा कांद्याची आणि लसणाची सालांचा धुर करा. त्याच्या धुरामुळे डास पळून जातील, तर तुम्ही या दोन्ही सालींचे पाणी झाडांसाठी खत म्हणून देखील वापरू शकता आणि त्याचे पाणी स्प्रे बाटलीत भरून कोपऱ्यात फवारल्यास कीटक आणि वाळविची पैदास होत नाही.
संत्र्या-लिंबाची साल
संत्री आणि लिंबाच्या सालींमधूनही तीव्र वास येतो. डासांना दूर करण्यासाठी तुम्ही संत्र्यांच्या व लिंबाच्या साली वाळवा
त्यानंतर या साली घरात पेटवा आणि यांचा धुर सर्वत्र पसरवा. अशाने घरातील डासांपासून सुटका मिळेल.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)