आपमध्ये मोठी फूट पडणार होती, एकनाथ शिंदेंचा दावा
दिल्ली विधानसभा निवडणूका नुकत्याच पार पडल्या आणि शनिवारी त्याचा निकालही लागला. या निवडणुकीत मतदारांनी भाजपवर विश्वास दाखवत भरघोस मतदान केल्याने तब्बल दोन दशकानंतर भाजपचे दिल्लीत पुनरागमन झाले आहे. तर सत्ताधारी आम आदमी पक्ष अर्थात आपचा दारूण पराभव झाला. याच दरम्यान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांनी केलेल्या एका दाव्याने मोठी खळबळ माजली आहे. दिल्लीत विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी आपच्या 15 उमेदवारांनी (शिवसेना) पक्षाच्या चिन्हासाठी आपल्याशी संपर्क साधला होता, परंतु युतीच्या युती धर्माला जागत आपण तो प्रस्ताव नाकारला, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला. 15 उमेदवार आपल्या संपर्कात होते, आपमध्ये मोठी फूट पडणार होती असं त्यांनी अप्रत्यक्षरित्या सांगितलं.
एकनाथ शिंदे यांचा नुकताच वाढदिवस झाला, त्यानिमित्ताने ठाण्यात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बोलतानाच एकनाथ शिंदे यांनी हे विधान केलं. आपचे 15 उमेदवार आपल्या संपर्कात होते, असे वक्तव्य शिंदे यांनी केलं. ‘आप’चे ( आम आदमी पक्ष) एकूण 15 उमेदवार माझ्यापर्यंत पोहोचले होते. शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. पण धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह त्यांच्याकडे गेले तर निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची बीज मते विभागली जातील, ज्याचा फायदा इतरांना होईल, असं मला वाटले. म्हणून मी त्यांना नकार दिला, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
भाजपचा प्रचार करण्याचे निर्देश
याच कार्यक्रमात शिंदेनी आपण युतीधर्माल जागल्याचाही पुनरुच्चार केला. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करा असे निर्देश मी आमच्या पक्षाच्या खासदारांना दिल्याचंही शिंदे यांनी नमूद केलं. युती धर्माचा आदर राखण्यासही खासदारांना सांगण्यात आलं होतं.
एकनाथ शिंदे यांचा नुकताच वाढदिवस झाला, त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेकांनी आपल्याला शुभेच्छा दिल्याचं शिंदे यांनी आवर्जून सांगितलं. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून नव्हे तर एकनाथ शिंदे म्हणून त्यांनी माझं स्वागत केलं,असेही शिंदे म्हणाले.
दिल्लीत भाजपचा दणदणीत विजय
गेल्या आठवड्यात 5 फेब्रुवारीला दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी मतदान झालं तर शनिवारी, 8 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल लागला. या निवडणुकीत 27 वर्षांनंतर भाजप प्रचंड बहुमताने सत्तेत आला आहे. भाजपने 70 पैकी 48 जागा जिंकल्या तर सत्ताधारी आम आदमी पक्षाचा दारूण पराभव झाला. अरविंद केजरीवाल यांच्या ‘आप’ला अवघ्या 22 जागा मिळाल्या. एवढंच नव्हे तर अरविंद केजरीवाल आणि मनिष सिसोदियांनाही पराभव पत्करावा लागला. तर या निवडणुकीत काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही.