गेल्या काही महिन्यांपासून महिलांसोबत गैरवर्तवणूक होण्याच्या घटनेत सातत्याने वाढ होत आहे. त्यात आता एका प्रसिद्ध सोशल मिडिया इन्फ्लुएन्सरचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे. यावेळी तिने त्या मुलाला चांगलाच धडा शिकवला. तिने याचा एक व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओवर अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया देत तिचे कौतुक केले आहे.
नेमकं काय घडलं?
सोशल मीडिया इन्फ्लुएंसर मानसी सुरवसे ही नेहमी इन्स्टाग्रामवर विविध व्हिडीओ पोस्ट करत असते. नुकतंच ती तिच्या सोसायटीतील एका इमारतीच्या जिन्यावर उभी राहून रील शूट करत होती. यावेळी तिने लाल रंगाचा टॉप आणि पांढऱ्या रंगाचा स्कर्ट घातला होता. यावेळी तिने समोर मोबाईल कॅमेरा चालू ठेवून व्हिडीओ शूटींग सुरु ठेवले. यात ही संपूर्ण घटना कैद झाली.
मानसी ही जिन्यावर उभी असताना गुलाबी रंगाची टीशर्ट आणि जिन्स घातलेला मुलगा तिथून जातो. त्या तरुणाला पाहून मानसी ही बाजूला होऊन त्याला जाण्यासाठी रस्ता देते. पण तो तरुण मानसीला एकटी समजून चुकीच्या पद्धतीने स्पर्श करुन पळून जाण्याचा प्रयत्न करतो. यावेळी मानसीने धाडस करुन त्या मुलाचा हात पकडते आणि त्याच्या जोरदार कानशिलात लगावते. यानंतर मानसी त्याला प्रॉब्लेम काय असे विचारते. तू जे काही केले आहेस, ते कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाले आहे, असेही त्याला सांगते. यानंतर तो मुलगा तिला सॉरी सॉरी बोलत वरच्या मजल्यावर जातो.
मानसीने व्हिडीओला दिले लांबलचक कॅप्शन
यानंतर मानसीने हा व्हिडीओ त्या तरुणाच्या घरी दाखवला. त्यावेळी त्याच्या कुटुंबियांनी तो मानसिक रुग्ण आहे असे सांगितले. यानंतर मानसीने त्याला मानसिक आरोग्याची समस्या असेल तर तो काहीही करणार का, असे विचारले. यानंतर तिने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. यासोबत तिने लांबलचक कॅप्शन देत घडलेला किस्साही सांगितला.
“मी सहजपणे व्हिडीओ रेकॉर्ड करत होते. हा मुलगा माझ्या इमारतीतच राहतो आणि त्याने अशा प्रकारचे वर्तन केले. जेव्हा आम्ही व्हिडीओचा पुरावा घेऊन त्याच्या घरी गेलो, तेव्हा त्याच्या घरच्यांनी सांगितले की याची मानसिक स्थिती ठीक नाही! याच्या डोक्यात काहीतरी समस्या आहे. म्हणून तो काहीही करेल, खरंच? कोणत्या अँगलने हा मानसिक रुग्ण दिसत आहे? लोक कपड्यांवरून जज करतात. मी तर व्यवस्थित कपडे घातले होते, तरीही हे सर्व घडले? हे योग्य आहे का? अशा लोकांचा धिक्कार असो! त्या समाजावर धिक्कार असो जो कपड्यांवरून लोकांना जज करतो. मला १०००० टक्के खात्री आहे की जर मी त्या वेळी साडी किंवा कुर्ता घातला असता तरी हेच झाले असते”, असे मानसी सुरवसेने म्हटले.
मानसीने शेअर केलेल्या या व्हिडीओवर अनेक कलाकारांनी कमेंट केल्या आहेत. अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने यावर कमेंट करत “कमाल…अजून एक दोन द्यायला हवी होती. सगळा मेंटल इम्बॅलेन्स बॅलन्स झाला असता”, अशी कमेंट केली आहे. तर अभिनेत्री हेमांगी कवीने “कडक मुली, मस्तच. आज कित्येक मुलींना समाधान/हायसं/आनंद वाटला असेल यार!!! Best part तु तिथे react झालीस पण video post करताना त्याचा चेहरा blur करण्याची सुज्ञपणा ही दाखवलास!”, असे तिने म्हटले आहे.