महाराष्ट्रामध्ये विधानसभेची रणधुमाळी सुरु असताना महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये लाडक्या बहिणींची मते आपल्याकडे खेचण्यासाठी रस्सीखेच पाहायला मिळाली होती. महायुती सरकारने लाडक्या बहिणींनी 1500 रुपये देण्याची घोषणा केल्यानंतर महाविकास आघाडीनेही सरकार आलं तर लाडक्या बहिणींना 3 हजार रुपये देण्याची मोठी घोषणा केली होती. या घोषणेनंतर राजकीय वर्तुळामध्ये भरपूर आरोप प्रत्यारोप देखील पाहायला झाले होते. सत्ताधाऱ्यांनी तर ही घोषणा म्हणजे आमचीच कार्बन कॉपी आहे, असं म्हणत महाविकास आघाडीला घेरलं होतं. पण निवडणुकीत लाडक्या बहिणींनी महायुतीला कौल दिल्याने काँग्रेसच्या नेतृत्वाताली ही घोषणा काही राज्यात चालली नसल्याचं दिसून आलं. महाराष्ट्रात ही घोषणा चालली नसली तरी आता काँग्रेसने दिल्लीत महाराष्ट्रातीलच घोषणा करून दिल्लीतील लाडक्या बहिणींना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्यामुळे दिल्ली काबीज करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. काँग्रेसनेही दिल्लीतील महिलांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. काँग्रेसने त्यांच्या जाहिरनाम्यामध्ये ‘प्यारी दीदी’ योजना सुरु करण्याचे अश्वासन दिले आहे. या योजने अंतर्गत महिलांना दर महिन्याला 2500 रुपये देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. त्यामुळे काँग्रेस दिल्ली विधानसभा निवडणुक जिंकली तर राज्यातील महिलांच्या खात्यात दर महिन्याला 2500 रुपये जमा होणार आहे.
काँग्रेसची मोठी घोषणा
दिल्लीच्या विधानसभा निवडणुका अगदी काही दिवसांवर असतानाच राजकीय पक्षांचे जाहिरनामे येत आहेत. या जाहिरनाम्यांमधून मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी नवनव्या घोषणा करण्यात येत आहे. सत्तेत आल्यावर काय कामे केली जाणार याची माहिती दिली जात आहे. काँग्रेसनेही आज आपला जाहीरनामा जाहीर करून बाजी मारण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेसने या जाहीरनाम्यातून महिलांसाठी खास योजना राबवण्याचे अश्वासन दिले आहे. दिल्लीमध्ये सत्तेत आल्यानंतर प्यारी दीदी योजना राबवण्यात येणार आहे. या योजने अंतर्गत दिल्लीमधील महिलांना दर महा 2500 रुपये मिळणार आहेत. यापूर्वी देखील आप सरकारने महिलांसाठी खास योजना राबवणार असल्याचे अश्वासन दिले होते. दिल्ली सरकार मुख्यमंत्री महिला सन्मान योजना राबवणार असे देखील सांगितले होते. या योजनेच्या अंतर्गत महिलांना 1000 रुपये दिले जाणार असल्याचं आपने जाहीर केलं होतं. पण आपच्या पुढे जाऊन काँग्रेसने महिलांना 2500 रुपये दर महा देण्याचं आश्वासन दिलं आहे. त्यामुळे महिला वर्ग कुणाच्या बाजूने मतदान करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
महाराष्ट्राची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना :
महाराष्ट्र सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवली होती. या योजने अंतर्गत महिलांना दर महिन्याला 1500 रूपये दिले जातात. महाराष्ट्राच्या आधी मध्य प्रदेशच्या सरकारने देखील महिलांसाठी ही योजना राबवली होती. आता दिल्लीमध्ये देखील महिलांसाठी खास योडना सुरु करण्यात येणार आहे. या योजनांमुळे अनेक गरजू महिलांना अर्थिक मदत देखील मिळणार आहे.