वातावरणातील बदल तसेच प्रदूषण आणि इतर अनेक कारणांमुळे चेहऱ्यावर मुरूमांसारख्या समस्या सतावत असतात. त्यामुळे अनेकजण चेहऱ्यावरील मुरूम, पुरळ कमी करण्यासाठी बाजारात मिळणाऱ्या प्रॉडक्टचा वापर करतात. त्यानंतर मुरूम आणि पुरळ सारख्या समस्या काळानुसार कमी होतात, पण त्यांचे डाग चेह-यावरून सहजासहजी जात नाही. याशिवाय चेह-यावर डाग येण्याची इतर अनेक कारणे आहेत. ती कमी करण्यासाठी लोकं अनेक उपाय करतात, पण त्यांचा फारसा परिणाम दिसत नाही. अशावेळी तुम्ही सुद्धा तुमच्या चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी घरगुती उपाय देखील अवलंबू शकता.
यासाठी तुमच्या चेह-यावरील डाग कमी करण्यासाठी कडुलिंबाची पाने देखील मदत करू शकतात. त्यात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ, अँटीफंगल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहेत. जे त्वचेसाठी फायदेशीर असतात. हे त्वचेशी संबंधित अनेक समस्या दूर करण्यास आणि त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करू शकतात. चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी कडुलिंबाच्या पानांचा वापर कसा करावा ते जाणून घेऊयात…
कडुलिंबाच्या पानांचा रस
तुम्ही तुमच्या चेह-यावर कडुलिंबाच्या पानांचा रस टोनर म्हणून देखील लावू शकता. आता टोनर तयार करण्यासाठी, प्रथम कडुलिंबाची पाने नीट धुवा आणि नंतर ती बारीक वाटून त्यांचा रस काढा. कडुलिंबाचा रस काढल्यानंतर, तुम्ही ते स्वच्छ कापड किंवा कापसाच्या मदतीने चेहऱ्यावर लावू शकता. चेहऱ्याच्या ज्या भागात मुरुमे किंवा डाग आहेत तिथे ते लावा. त्यानंतर हा रस चेह-यावर 20-30 मिनिटे राहू द्या आणि नंतर कोमट पाण्याने धुवा. यामुळे चेहऱ्यावरील डाग कमी होण्यास मदत होऊ शकते.
कडुलिंब आणि हळद पेस्ट
कडुलिंब आणि हळद या दोन्हीमध्ये असलेले पोषक घटक त्वचेसाठी फायदेशीर असतात. यासाठी कडुलिंबाच्या पानांची पेस्ट बनवा आणि त्यात हळद पावडर मिक्स करा. त्यांनतर ही पेस्ट तुमच्या चेहऱ्यावर लावा आणि 15-20 मिनिटे सुकू द्या. नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. आठवड्यातून दोनदाच हा फेस पॅक चेहऱ्यावर लावा.
कडुलिंब आणि गुलाबपाणी
गुलाबपाणी हे त्वचेला थंड आणि मॉइश्चरायझ करते, तर कडुलिंबाची पाने त्वचेचे संक्रमण रोखण्यास आणि डाग कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे कडुलिंब आणि गुलाबपाणी या दोघांची पेस्ट चेहरा उजळवण्यास मदत करू शकतात. यासाठी कडुलिंबाच्या पानांची पेस्ट तयार करा, त्यात गुलाबपाणी मिक्स करा.आणि चेहऱ्यावर लावा. 15-20 मिनिटे चेहऱ्यावर राहू द्या आणि नंतर चेहरा धुवा.
अशा परिस्थितीत तुम्ही अनेक प्रकारे कडुलिंबाच्या पानांचा वापर करून चेह-यावरील डाग कमी करू शकतात. तसेच या घरगुती उपायाने तुमच्या चेह-यावर कोणतेही दुष्परिणाम होत नाही.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)