काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप, काँग्रेसचे निष्ठावंत बडे नेते भाजपाच्या वाटेवर, पक्ष सोडण्याचे कारण…

काँग्रेस पक्षाकडून सतत झालेले दुर्लक्ष, विधानसभा अध्यक्ष, राज्य मंत्रिमंडळात न मिळालेली संधी, राजगड कारखान्याला मिळत नसलेले कर्ज यामुळे माजी आमदार संग्राम थोपटे काँग्रेस सोडणार आहे. ते पक्षाच्या कार्यकत्यांशी चर्चा करुन लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा भोर विधानसभा मतदार संघात सुरु आहे. यामुळे भोरमध्ये मोठा राजकीय भूकंप होणार हे निश्चित झाले आहे. त्यांनीही फेसबुकचा कव्हर फोटो अपडेट करत एकप्रकारे या चर्चेला दुजोरा दिला आहे.

राज्याच्या आणि पुण्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार आहे. भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे हे काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये जाणार आहे. लवकरच ते मुंबईत पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपच्या एका जेष्ठ नेत्याच्या पुढाकाराने संग्राम थोपटे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.

संग्राम थोपटे हे काँग्रेसचे निष्ठावंत नेते आहेत. आता ते काँग्रेसला रामराम करुन भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. त्यासाठी त्यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांचीही भेट घेतल्याची माहिती आहे. संग्राम थोपटे यांनी अद्याप काँग्रेसचा राजीनामा दिला नाही. रविवारी २० एप्रिलला भोर तालुक्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा ते घेणार आहे. त्यावेळी कार्यकर्त्यांशी चर्चा करुन काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा देणार असल्याची माहिती मिळली आहे.

२०१९ विधानसभा निवडणुकीनंतर नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यावर अध्यक्षपदासाठी संग्राम थोपटे यांचे नाव आघाडीवर होते. मात्र त्यावेळी त्यांना डावलले गेले. शिवसेनेला बरोबर घेऊन आघाडी सरकार स्थापन झाले. त्यावेळी मंत्रिपदासाठी संग्राम थोपटे यांचे नाव निश्चित झाले होते. मात्र रात्रीत माशी शिंकली आणि त्यांचे नाव मागे पडले. अनेकदा थोपटे यांच्यावर काँग्रेसकडून अन्याय झाला. पक्ष श्रेष्ठींनी दुर्लक्ष केले. या शिवाय संग्राम थोपटे अध्यक्ष असलेला राजगड सहकारी साखर कारखाना हा अडचणीत आहे. या कारखान्याला राज्य सरकारने ८० कोटींचे कर्ज मंजूर केले होते. पण लोकसभेला संग्राम थोपटे यांनी सुप्रिया सुळे यांना मदत केली. त्यानंतर अजित पवारांच्या विरोधामुळे त्यांच्या कारखान्याला मंजूर केलेले कर्ज नाकारण्यात आले.

कारखान्याला मदत मिळावी यासाठी संग्राम थोपटे भाजपमध्ये जाणार असल्याची राजकीय चर्चा सुरू आहे. भोरचे थोपटे कुटुंबिय आणि बारामतीचे पवार कुटुंबिय यांचा जुना राजकीय वाद आहे. संग्राम थोपटे यांचे वडील अनंतराव थोपटे हे काँग्रेसचे मातब्बर आणि निष्ठावंत नेते आहे. पुणे जिल्ह्यावर त्यांची मजबुत पकड होती. मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचे नाव जवळपास निश्चित झाले असताना शरद पवारांनी ताकद लावून १९९९ साली त्यांचा पराभव केला. त्यानंतर अनंतराव थोपटे हे राजकारणात थोडेसे मागे पडले.

कोण आहेत संग्राम थोपटे

  • सोनिया गांधीचे निकटवर्तीय आणि काँग्रेसचे माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे यांचे संग्राम थोपटे पुत्र आहेत. संग्राम थोपटे यांना वडिलांपासून राजकीय वारसा मिळाला आहे.
  • 2002 मध्ये संग्राम थोपटे भोर पंचायत समितीमध्ये उपसभापती झाले होते..
  • 2009 मध्ये विधानसभा निवडणूक लढवत ते भोर विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले. त्यानंतर 2014 आणि
  • 2019 विधानसभा निवडणुकीत विजयी होत हॅट्रिक केली.
  • 2024 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी दादा गटाचे आमदार शंकर मांडेकर यांच्या विरोधात संग्राम थोपटे यांना पराभव स्वीकारावा लागला.
  • संग्राम थोपटे यांचे वडील अनंतराव थोपटे यांनी महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष रुजवण्यासाठी आणि वाढविण्यासाठी मोठे योगदान दिले. सध्याच्या अनेक बड्या नेत्यांना अनंतराव थोपटे यांनी त्यांच्या काळात निवडणूक लढवण्यासाठी पक्षाच तिकीट देऊन संधी दिली होती. त्यामुळे आजही त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे.
  • 40 वर्षांपासून भोर विधानसभेवर थोपटे कुटुंबियांचे वर्चस्व आहे. सहा वेळा अनंतराव थोपटे आमदार झाले आहेत. 3 वेळा संग्राम थोपटे आमदार म्हणून निवडून आले आहेत. अनंतराव थोपटे सलग 14 वर्ष मंत्री राहिले आहेत. पश्चिम महाराष्ट्रमधील काँग्रेसचे मोठे नाव म्हणून थोपटे यांची ओळख आहे.
(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)