महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आज सकाळीच राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थवर पोहोचले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. या भेटीमागे अनेक राजकीय समीकरणं आहेत. उदय सामंत हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आले. ही सदिच्छा आणि राजकीय भेट असल्याची माहिती मिळत आहे. मनसे नेते संदीप देशपांडे, अभिजित पानसे या भेटीच्यावेळी तिथे उपस्थित असल्याची माहिती आहे. राजकीय चर्चा देखील या भेटीत अपेक्षित आहे. पुढच्या काही महिन्यात महापालिका आणि विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लागू शकतात. त्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.
सध्या एकनाथ शिंदे यांनी पक्ष विस्तार आणि संघटना बळकट करण्याकडे लक्ष दिलं आहे. राज्यभरातून ठाकरे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने शिवसेनेत सहभागी होत आहेत. ठाकरे गटाला कमकुवत करण्याची शिंदे यांची रणनिती आहे. त्यात मुंबई महापालिकेची निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. मुंबई महापालिका जिंकण्यासाठी भाजप, शिवसेना, ठाकरे गट आणि मनसे हे चारही पक्ष सर्वात ताकद पणाला लावतील. मागची अनेक वर्ष मुंबई महापालिका ठाकरे गटाचा मुख्य आधार राहिली आहे. हाच आधार हिसकावून घेण्याचा शिवसेना-भाजपचा प्रयत्न आहे.
या भेटीमागे उद्देश काय?
विधानसभा, लोकसभा निवडणुकीत भाजप मनसेसोबत युती करण्यासाठी तयार होती. पण एकनाथ शिंदे यांच्या विरोधामुळे मनसेचा महायुतीत सहभाग होऊ शकला नाही, असं राज ठाकरे यांचं मत आहे. यावरुन मनसे आणि शिंदे शिवसेनेत असलेली कटुता दूर करणं हा सुद्धा उदय सामंत यांच्या भेटीमागे एक उद्देश असू शकतो. उदय सामंत हे एकनाथ शिंदे यांचे दूत म्हणून भेटायला आले आहेत. महापालिका निवडणुकीत भाजप मनसे युती व्हावी यासाठी प्रयत्न सुरु आहेत. शिवसेना आणि मनसेत कटुता राहू नये यासाठी एकनाथ शिंदे यांनी उदय सामंत यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरु केलेत. विधानसभा निवडणुकीत मनसे उमेदवारांमुळे आठ ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार पराभूत झाले होते. अशी परिस्थिती पुन्हा उदभवू नये, यासाठी खबरदारी म्हणून मनसेशी जुळवून घेण्याचे प्रयत्न सुरु झालेत. भाजप मनसे सोबत युती करण्याचे संकेत देत आहे. आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने सुद्धा मनसेसोबत डायलॉग सुरु केला आहे.