आज भाजप आमदार सुरेश धस हे परळीच्या दौऱ्यावर होते, यावेळी त्यांना आंदोलकांच्या रोषाला सामोर जावं लागलं. सुरेश धस हे परळीची बदनामी करत आहेत, असा आरोप करत त्यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आलं. शिरसाळा गावात आमदार सुरेश धस यांना काळे झेंडे दाखवण्यात आले, तसेच जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली, आता यावर सुरेश धस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
नेमकं काय म्हणाले सुरेश धस?
लोकशाही मार्गाने काळे झेंडे दाखवण्याचा अधिकार आहे, तो त्यांनी करावा. मात्र पोलिसांसमोर दगड उचलण्याची मजल या लोकांची जाते. माजी पालकमंत्री असलेल्या नेत्याच्या भागातील आणि दुसऱ्या मंत्री असलेल्या नेत्याच्या भागातील हे लोक कसे वागतात. असं म्हणत त्यांनी यावेळी धनंजय मुंडे आणि पकंजा मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, मी पाच टर्म आमदार राहिलो आहे, एकदा राज्यमंत्री होतो तरीही माझ्या गाडीसमोर अशी पोरकट लक्षणं हे लोक करतात. हे दगड घेऊन मला मारणार होते का? ते दगड घेऊन मला मारणार नाहीत. मात्र आम्ही यांच्यासाठी काहीतरी करतो हे दाखवण्यासाठीची ही स्पर्धा आहे. मात्र ही गुंडगिरी, दहशत संपवण्यासाठी मी आता राजकारणात उतरलो आहे. शिरसाळ्यात जे मार्केट कमिटीने गाळे काढले ते गायरान जमिनीवर काढले. रस्त्यावर निषेध करायला जे लोक आले ते हे गाळेधारक असावेत किंवा बेकायदेशीर वीटभट्टीवाले असावेत, असं सुरेश धस यांनी म्हटलं आहे.
दरम्यान सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याची बातमी समोर आली होती. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला चांगलंच उधाण आलं. यावरून मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील सातत्यानं सुरेश धस यांच्यावर हल्लाबोल करत आहेत, मात्र दुसरीकडे सुरेश धस यांनी यावर प्रतिक्रिया देणं टाळलं आहे. मनोज जरांगे पाटील हे आमचे दैवत आहेत, मी त्यांच्यावर काहीही बोलणार नाही, असं धस यांनी म्हटलं आहे.