जागावाटपात नमते घेऊ नये ! कॉंग्रेस नेत्यांची भूमिका
मुंबई : लोकसभा निवडणुकीत झालेल्या जागावाटपात अपेक्षित जागा न मिळाल्याने विधानसभा निवडणुकीत ही पुनरावृत्ती टाळण्यासाठी काँग्रेसने आतापासूनच सावध पवित्रा घेतला आहे. त्यानुसार पक्षाने जागावाटपाच्या चर्चेत नमती भूमिका घेऊ नये, अशी सूचना वरिष्ठ नेत्यांकडून केली जात आहे. जागावाटप निश्चित करताना तिन्ही पक्षांच्या कामगिरीचा विचार करण्याची मागणी या नेत्यांकडून होत असल्याचे सूत्रांनी सांगितले. विशेष म्हणजे, आगामी निवडणुकीत काँग्रेसच्या वाट्याला येणाऱ्या जागांनुसार प्रचाराची रणनीती ठरणार असल्याचे पक्षातील एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.
                      विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची विशेष बैठक बुधवारी मुंबईत आयोजित करण्यात आली होती. तत्पूर्वी , काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेले यश महत्त्वाचे असून , जागावाटप निश्चित करताना त्यानुसारच निर्णय घेण्याची मागणी यावेळी अनेकांकडून करण्यात आली, तर या निवडणुकीतही दलित आणि अल्पसंख्याक मतांवर लक्ष केंद्रीत करण्याची सूचना पुढे आली. ज्यांची कामगिरी सरस त्यांचा मुख्यमंत्री हे धोरण असावे , अशी मागणीही अनेक नेत्यांकडून करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले .
लोकसभा निवडणुकीदरम्यान सत्ताधाऱ्यांवर टीका करताना ‘५० खोके, एकदम ओके’ हा प्रचाराचा मुद्दा बनवण्यात आला होता. विधानसभा निवडणुकीत त्याची पुनरावृत्ती करतानाच, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांविरोधात लढत असलेल्या मतदारसंघांत त्यानुसार प्रचार करण्याची सूचना दिल्लीतील ज्येष्ठ नेत्यांकडून देण्यात आली आहे. याशिवाय महागाई, शेतकरी आणि बेरोजगारीच्या मुद्द्यांवरही प्रचारात भर दिला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या वाट्याला किती जागा येतात, हे निश्चित झाल्यानंतर काँग्रेसकडून प्रचाराची रणनीती ठरवली जाणार आहे. सध्या पक्षाला १२०च्या आसपास जागा मिळतील असे गृहित धरून त्यानुसार प्रचाराची रणनीती ठरवली जात आहे . मात्र त्याहून कमी जागा मिळाल्यास यात बदल अपेक्षित असल्याचे पक्षातील एका वरिष्ठ नेत्याने सांगितले.