Police Commissioner Amitesh Kumar: पुण्यातील काही गुन्हेगार बाहेरील जिल्ह्यात जाऊन पवन चक्क्या वाल्यांना त्रास देतात, धमक्या देतात. त्यांची माहिती गोळा केली जात आहे. पोलीस स्टेशनमध्ये येणारे कोणी आका, काका किंवा इतर कोणीही असो कुणाला सोडणार नाही. त्यांना सात पिढ्या लक्षात राहील, असा धडा शिकवू, असा सज्जड दम पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला. पुणे पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी पुण्यातील गुन्हेगारी कमी झाली असल्याचा दावा केला.
पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्था संदर्भात बोलताना अमितेश कुमार म्हणाले, संख्यात्मक दृष्टिकोनातून बघितले तर पुण्यातील गुन्हेगारी कमी झाली आहे. पूर्वी प्रत्यके महिन्याला सरासरी 8.5 खून होत होते. आता महिन्याला सरासरी 7.2 खून होतात. आम्हाला हे उद्दिष्ट 6.5 करायचे आहे. पुण्यात खुनाचा प्रयत्न करण्याच्या गुन्ह्यामध्ये 34 टक्के घट झाली आहे. या आकडेवारी आम्ही समाधानी नाही, असे अमितेश कुमार यांनी म्हटले.
चुकीचे घडले तर सोडणार नाही
वाहन तोडफोड किंवा चेन स्नॅचिंगच्या घटना गेल्या काही दिवसांत वाढल्या आहेत. त्या दृष्टिकोनातून उपाययोजना करण्यात येत असल्याचे अमितेश कुमार यांनी म्हटले. ते म्हणाले, काही गुन्हेगारी टोळ्याचा विषय आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगारांना समज देण्यात आली होती. गेल्या आठवड्यात शिवजयंती दरम्यान सॉफ्टवेअर इंजिनियर तरुणाला मारहाण झाली होती. त्यातील आरोपींना मोका लावण्यात आला आहे. त्याच्या टोळीप्रमुखाला देखील आरोपी करण्यात आले आहे. गजा मारणे याला आरोपी करण्यात आले असून त्याला देखील अटक करण्यात येईल. सध्या तीन आरोपींना अटक आहे. इतर आरोपी फरार आहे. त्यांचा शोध सुरू आहे. टोळीतील गुन्हेगारांना मुख्य प्रवाहात यायचे असेल तर आमचे त्यांच्याशी शत्रुत्व नाही. पण त्यांच्याकडून काही चुकीचे घडले तर त्यांना सोडणार नाही, असे अमितेश कुमार यांनी म्हटले.
कोणतीही गँग नाही…
सोशल मीडियावर गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणाऱ्या 20 ते 22 जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. आता त्यांचा धागा सापडलेला आहे. त्यांच्यावर कारवाई सुरू आहे. कोयता गँग किंवा टोळी अशी कुठली एक टोळी अस्तित्वात नाही. शहरात कोणत्या गँग नाही. कोयता किंवा हत्यार हातात घेऊन काही गुन्हेगार गुन्हे करतात. त्यांचा बंदोबस्त करण्याचे काम पोलिस करतात. शहरात कायदा सुव्यवस्था अबाधित आहे, असा दावा अमितेश कुमार यांनी केला.
राजकीय दबाव असतो का? या प्रश्नावर अमितेश कुमार म्हणाले, आमच्यावर कुणाचा दबाव नाही. लोकांचा विश्वास आमच्यासाठी महत्वाचा आहे. लोकप्रतिनिधीची प्रतिक्रिया स्वाभाविक आहे. सर्व लोकप्रतिनिधींचा आमचा सोबत उत्तम संवाद आहे. त्यांच्याकडून उपस्थित होणाऱ्या प्रश्नाचे निराकरण आम्ही करत असतो. पोलिसांवर आरोप करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे.
राहुल सोलापूरकरवर सध्यातरी गुन्हा नाही
पुण्यामध्ये अत्यंत आवश्यकता असलेल्यांना नवीन शस्त्र परवाना दिले जाईल. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना परवाना देणार नाही. आतापर्यंत 300 लायसन्स रद्द केले आहेत. तसेच वाहतूक पोलीस लपून छपून कारवाई करत असतील तर ते चुकीचे आहे. त्यांनी चौकात थांबले पाहिजे. कुठेतरी आडोश्याला नाही. तसे न करण्याच्या कठोर सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. राहुल सोलापूरकरवर सध्यातरी गुन्हा दाखल करणार नाही, असे एका प्रश्नाच्या उत्तरात अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले.