‘हा काय आश्रम आहे का?’ म्हणत रुग्णाला डॉक्टरने हाकललं, तिसऱ्या दिवशी घरी मृत्यू

डिस्चार्ज मिळून घरी गेला, तिसऱ्या दिवशी रुग्णाचा मृत्यूImage Credit source: TV9 Marathi

‘‘सकाळी माझी शुगर 31 इतकी खाली आली होती. त्‍यामुळे मला चालताही येत नव्‍हते. माझे पाय सूजलेले आहेत. घरी मी एकटा राहतो. काळजी घेणारे कोणी नाही. मला आणखी काही दिवस येथे उपचारासाठी राहूद्या’’ अशा शब्‍दात आर्जव करणाऱ्या रुग्‍णाच्या विनंतीनंतरही डॉक्टरला पाझर फुटला नाही. नातेवाईकांनी विनंती करूनही डॉक्टरांनी ऐकलं नाहीच. उलट तू बरा झाला आहेस, इथे रहायला ‘हा काय आश्रम आहे का?’ असा अपमानित करणारा शब्‍दप्रयोग करत डॉक्टरांनी त्याला रुग्‍णालयातून सुटी (डिस्‍चार्ज) घ्यायला लावली. धक्कादायक गोष्ट म्हणजे, घरी गेल्यावर त्या रुग्‍णाचा तिसऱ्या दिवशी घरी अंत झाला. गिरीश मोरे (वय 44, रा. येरवडा) असे या मृत्‍यू झालेल्‍या रुग्‍णाचे नाव आहे. यामुळे बरीच खळबळ माजली आहे.

डॉक्टरांना देवाचं दुसरं रूप मानलं जात, पेशंटचे प्राण वाचवणाऱ्या डॉक्टरांना लोकं खूप मानतात, पण त्याच डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचं काही बरंवाईट झालं तर काय ? अशावेळी कोणाकडे दाद मागायची असा प्रश्न उपस्थित होत आहे. रुग्‍णाला मरणाच्‍या दाढेतून बाहेर काढणाऱ्या डॉक्‍टरांची तुलना देव माणसासोबत केली जाते.परंतु, जिल्‍हा रुग्‍णालयातील उपचार करणारे डॉक्‍टर खरेच त्‍या बिरूदावलीला जागतात का? असा प्रश्‍न या निमित्‍ताने नातेवाइकांनी उपस्थित केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार वर नमूद केलेली घटना ही पुण्यात सुमारे सव्‍वा दोन महिन्‍यापूर्वी 10 जानेवारीला घडला असून यामध्‍ये नातेवाइकांनी रुग्‍ण व डॉक्‍टरांसोबतचा संवाद रेकॉर्ड केला आहे. गिरीश मोरे ( वय 44) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. शुगरचा त्रास झाल्‍याने मोरे यांना जिल्‍हा रुग्‍णालयात 3 जानेवारीला पुरूषांच्‍या मेडिसिन या कक्षात उपचारासाठी दाखल केले होते.त्‍यांच्‍यावर फिजिशियन डॉ. अमोल बोंद्रे हे उपचार करत होते. त्‍यांनी रुग्‍णाचे ‘जुनाट व्‍यसनाधीनता व मधुमेह’ (क्रॉनिक अल्‍कोहोल ॲंड टाइप २ डायबेटिस) असे निदान केले. उपचारानंतर मोरे यांची शुगर नियंत्रणात आली.

मात्र 10 जानेवारीला त्यांची शुगर नियोजित प्रमाणापेक्षा खूपच कमी म्‍हणजे 31 इतकी झाली होती. त्यांच्या पायांवरही सूज होती. त्‍यामुळे त्‍यांना धड चालताही येत नव्‍हते. म्हणून त्यांनी डॉक्टांना आणखी काही दिवस तेथे रुग्णालयात राहू देण्याची विनंती केली मोरे यांच्या नातेवाईकांनीही डॉक्टरांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र डॉक्टरांनी त्यांचं काहीच ऐकल नाही, उलट तुमच्यामुळे आधीच त्यांना जास्त दिवस राहू दिल्याचं उत्तर त्यांनी दिलं. रुग्णाला काही समसया नाही, तुम्ही डिस्चार्ज घ्या असा आग्रह डॉ. बोंद्रे यांनी पेशंट आणि त्यांच्या नातकेवाईकांना केला. त्‍यावर रुग्‍ण व नातेवाईकही त्‍यांना बरे वाटत नाही, घरी कोणीच नही बघायला, त्यांना आणखी काही दिवस राहूद्या अशी विनंती करत असल्‍याचे व्हिडीओमध्‍ये दिसून आले. मात्र डॉक्टर त्यांच्या म्हणण्यावर ठाम होते.

अखेर मोरे यांना डिस्चार्ज देण्यात आला आणि घरी पाठवण्यात आलं. पण घरी गेल्या अवघ्या तिसऱ्या दिवशी मोरे यांनी अखेरचा श्वास घेतला. या घटनेमुळे मोठी खळबळ माजली असून ज्यांचं काम रुग्णांचं जीव वाचवण्याचं आहे, त्याच डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे एका व्यक्तीचा हकनाक जीव गेल्याचा आरोप होत आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)