काल बरसले आज नरमले, 24 तासांत काँग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्षांचा युटर्न

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, रविवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यांनी फडणवीस सरकारची तुलना औरंगजेबाच्या राज्यकारभाराशी केली होती. मात्र त्यानंतर आता अवघ्या 24 तासांमध्येच त्यांनी युटर्न घेतला आहे.

नेमकं काय म्हणाले हर्षवर्धन सपकाळ? 

भ्रष्टाचार आणि हिंसाचार या दोन्हीचा या सरकारच्या माध्यमातून जो उद्रेक उभ्या महाराष्ट्राला बघायला मिळतोय तो अत्यंत क्रूर आणि वाईट स्वरुपाचा आहे. सध्याचा जो देवेंद्र फडणवीस सरकारचा कारभार आहे तो हा कारभार आणि औरंगजबाचा कारभार एक सारखाच असल्याचं वक्तव्य मी काल केलं होतं. यात कुठल्याही प्रकारची चूक नाही. औरंगजेब निश्चित क्रूर होता, आणि औरंगजेबाने स्वत:चा भाऊ दाराशिको याचा खून केला, त्यांचं धड दिल्लीत गाडलं. वडिलांना अटक केली. त्यामुळे औरंगजेब निश्चित क्रूर होता. औरंगजेब जेवढा क्रूर होता तेवढंच फडणवीसांचं सरकार क्रूर आहे. हे माझं वक्तव्य होतं.

मात्र या विधानाच्या संदर्भामध्ये भाजपची का पोटदुखी झाली आहे, ते मला समजलं नाही. मी काही चुकीचं बोललो नाही. मी काही फडणवीसांबद्दल अपशब्द वापरले नाहीत. देवेंद्र फडणवीस यांचा एकेरी उल्लेख मी केला नाही. देवेंद्र फडणीसांनी औरंगजेबासारखी वेशभूषा करावी फक्त तेवढाच त्यांच्यामध्ये फरक आहे, असं देखील मी बोललो नाही. मी शुद्ध स्वरुपामध्ये जो राज्यकारभार आहे तो अत्याचार आणि अत्यंत क्रूर पद्धतीनं हे सरकार हाकत आहे, या संदर्भात माझी केलेली ही तुलना आहे.

माझी टीका ही राज्यकारभाच्या अनुषंगाने आहे. मात्र असं असताना कालपासून त्यांच्याच लोकांनी देवेंद्र फडणवीसांची तुलना औरंगजेबाशी केली. माझी तुलना ही राज्यकारभाराशी होती. मात्र भाजपमधील जी नेतेमंडळी आहेत ती सरसकट देवेंद्र फडणीस हे औरंगजेबासारखे होते असा जो कांगावा करत आहेत, याचाच अर्थ काय तर त्यांच्याच पक्षातील लोक फडणवीसांना औरंगजेब ठरू पाहात आहेत. असा घणाघात यावेळी हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)