गुन्हे शाखेच्या पथकाने वाघमारे याने पार्टी दिलेल्या बारपासून तपासाला सुरुवात केली असता, एका स्कुटीवरून दोघेजण वाघमारे याच्या कारचा पाठलाग करताना सीसीटीव्हीत आढळले. सायन ते वरळी प्रवासादरम्यान त्यांनी एका टपरीवर काही खरेदी करून ऑनलाइन माध्यमातून पैसे दिले. हे पुरावे हाती लागताच पोलिसांनी प्रथम फिरोज याच्या नालासोपारा येथून मुसक्या आवळल्या आणि त्याने दिलेल्या माहितीनुसार रेल्वेने मुंबईबाहेर पळणाऱ्या शाकिब याला आरपीएफच्या मदतीने कोटा येथून ताब्यात घेतले. वरळी पोलिसांनी स्पा मालक संतोष शेरेकर याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यानेच या दोघांना सहा लाखांची सुपारी दिल्याचे कळले. सहा लाखांपैकी चार लाख रुपये शेरेकर याने दोघांना दिले होते. स्पामधील महिलेसह तीन कर्मचारी तसेच शाकिब याच्यासोबत सापडलेले दोघे जण संशयाच्या भोवऱ्यात असून पोलिस त्यांची चौकशी करत आहेत. आरटीआय अर्ज, पोलिस तक्रारी तसेच वेगवेगळ्या माध्यमातून वाघमारे धमकावत असल्याने त्याचा काटा काढण्यात आल्याचे आत्तापर्यंतच्या तपासातून स्पष्ट झाले आहे.
तीन रंगाच्या शाईत रोजनिशी
गुरू वाघमारे याला रोजनिशी लिहायची सवय होती. दिवस कसा गेला याबाबत तो सविस्तर डायरीमध्ये नोंद करायचा. वाघमारे रोजनिशी लिहिताना हिरव्या, लाल आणि निळ्या या तीन रंगांच्या शाईचा वापर करीत असल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे. दिवस चांगला गेला, चार पैसे मिळाले तर हिरव्या, दिवस खराब गेला तर लाल आणि सर्वसाधारण दिवस गेल्यास वाघमारे निळ्या शाईचा वापर करून दिवसभरातील घटनाक्रम लिहायचा, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.