उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जेवण जास्त वेळ टिकत नाही, विशेषतः अन्न फ्रिजमध्ये ठेवलं नाही तर ते लगेच खराब होतं. अनेकदा सकाळी शाळेसाठी किंवा ऑफिससाठी तयार केलेल्या डब्याची दुपारपर्यंत चव बदलते आणि त्याला कुबट वास येऊ लागतो. कारण उष्ण तापमानामुळे अन्न लवकर खराब होण्याची शक्यता असते. पण काही सोप्या टिप्स वापरल्यास तुमचं जेवण अधिक वेळासाठी चांगलं राहू शकतं.
प्रथम जेवण ठेवण्यासाठी वापरला जाणारा डबा. बाजारात सध्या इन्सुलेटेड आणि एअरटाइट डबे उपलब्ध आहेत, जे उष्णता नियंत्रित करतात. त्यामुळे उन्हाळ्यात प्लास्टिकचा डबा वापरण्याऐवजी असे डबे वापरा, ज्यामुळे अन्नाचा ताजेपणा अधिक काळ टिकतो.
दुसरं आणि महत्त्वाचं म्हणजे गरम अन्न थेट डब्यात न भरता ते थोडं थंड करून मग भरा. कारण गरम अन्न डब्यात भरल्यास त्यातून वाफ निर्माण होते आणि ही वाफ डब्याच्या आतील तापमान वाढवते. परिणामी, बॅक्टेरिया वाढतात आणि अन्न पटकन खराब होतं.
तिसरं, जेवण तयार करताना हलकं आणि पचायला सोपं असं काहीतरी निवडावं. उदाहरणार्थ, कमी मसाल्याचं वरण, गोडी डाळ, भात किंवा सूप. जड आणि तेलकट पदार्थ उन्हाळ्यात पचायला जड असतात व त्यांची खराब होण्याची शक्यता जास्त असते
तसेच, चव आणि पोषणाच्या दृष्टीने आपण फळं खाणं अधिक पसंत करतो. पण उन्हाळ्यात काही रसाळ फळं जसं की केळी, पपई किंवा द्राक्षं, इतर फळांसोबत न देता ती वेगळ्या कंटेनरमध्ये द्यावी. शक्य असल्यास, सकाळी पॅक केलेली फळं १-२ तासात खाऊन टाकावीत.
बरेच जण रात्रीचं शिळं अन्न दुसऱ्या दिवशी डब्यात नेतात, पण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शक्यतो ही सवय टाळा. विशेषतः मांसाहारी जेवण टाळावे आणि सकाळी बनवलेलं फ्रेश जेवण डब्यात द्यावं.
शेवटी, जर तुमच्या कामाच्या ठिकाणी फ्रिजची सुविधा असेल, तर डबा ऑफिसमध्ये गेल्यावर त्वरित तिथे ठेवा. यामुळे अन्नाचं तापमान नियंत्रित राहतं आणि ते जास्त काळ टिकतं. यासोबतच हात धुवूनच डबा भरावा आणि स्वच्छतेकडे लक्ष द्यावं.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)