पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे , वैष्णवी हगवणे या तरुणीनं 16 मे रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली, तीने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात पोलिसांनी वैष्णवीचा पती, दीर, सासरा, सासू आणि नणंद यांना अटक केली आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी वैष्णवीचा पती, तिची सासू आणि नणंद यांना अटक केली होती. तर तिचा सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर फरार होते. अखेर पोलिसांनी सापळा रचून त्यांना देखील अटक केली. या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. ती म्हणजे पोलिसांनी वैष्णवीचा पती शशांक हागवणे आणि तिचा दीर सुशील हगवणे यांच्याकडे असलेलं परवानाधारक पिस्तूल पोलिसांनी जप्त केलं आहे. तसेच राजेंद्र हगवणे याने पळून जाण्यासाठी जे वाहन वापरले होते, ते देखील पोलिसांनी जप्त केलं आहे.
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी आज वैष्णवीचे दोन्ही भाऊ विराज आणि पृथ्वीराज तसेच तिची एक मैत्रीण अशा एकूण तीन साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. पोलिसांनी वैष्णवीला स्त्रीधन म्हणून देण्यात आलेले चांदीची भांडी देखील जप्त केली आहेत. त्यामध्ये पाच ताटं ,पाच तांबे ,चार वाट्या, एक करंडा आणि अधिक महिन्यात देण्यात आलेल्या एका चांदीच्या ताटाचा समावेश आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
16 मे रोजी वैष्णवी हगवणे नावाच्या तरुणीने पुण्यात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सासरच्या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात पोलिसांनी वैष्णवीचा पती, तिचा दीर, तिचा सासरा आणि सासू तसेच नणंद यांना अटक केली आहे. वैष्णवीच्या अंगावर मारहाणीच्या खुणा देखील आढळून आल्याची माहिती समोर येत आहे. वैष्णवीच्या आत्महत्या प्रकरणानं राज्यभरात खळबळ उडाली आहे. वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे हा राष्ट्रवादीचा पदाधिकारी होता, मात्र हे प्रकरण समोर आल्यानंतर त्याची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आली आहे.
दरम्यान तिच्या सासऱ्या संदर्भात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे, ती म्हणजे 16 मे रोजी वैष्णवीने आत्महत्या केली, त्यानंतर 17 मे रोजी तो तिचा मृतदेह पाहाण्यासाठी रुग्णालयात आपल्या 20 ते 25 कार्यकर्त्यांसह गेला होता. मात्र गुन्हा दाखल होणार असल्याची कुणकुण लागताच तो फरार झाला, त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली.