उन्हाळ्यात घरात असो किंवा बाहेर, प्रत्येक ठिकाणी उष्णतेचा त्रास होतोच. मात्र स्वयंपाकघरात तर हा त्रास आणखीनच जास्त जाणवतो. स्वयंपाकाच्या वेळी शेगडीवरून निघणारी गरम वाफ, फोडणीचे उठणारे उकळते थेंब आणि बाहेरून येणाऱ्या सूर्यकिरणांची उष्णता या सगळ्यांमुळे स्वयंपाकघराची स्थिती ‘भट्टी’सारखी होते.
मात्र काही साध्या आणि स्मार्ट उपायांनी तुम्ही हा त्रास नक्कीच कमी करू शकता!
1. हवा खेळती ठेवा : स्वयंपाकघर थंड ठेवण्याचा पहिला आणि महत्त्वाचा उपाय म्हणजे योग्य वायुवीजन (Ventilation). जर तुमच्या किचनमध्ये एक्झॉस्ट फॅन नसेल, तर आधी तो बसवा. स्वयंपाक सुरू करण्याआधी एक्झॉस्ट फॅन चालू करा आणि शक्य असल्यास खिडक्या उघड्या ठेवा. यामुळे स्वयंपाकाच्या वेळी तयार होणारी गरम हवा बाहेर निघते आणि किचनचा उकाडा कमी होतो.
2. मिनी कूलर किंवा पोर्टेबल फॅनचा वापर : स्वयंपाक करताना घामाच्या धारा थांबवण्यासाठी पोर्टेबल फॅन किंवा मिनी कूलर ही उत्तम सोय आहे. हे छोटे उपकरण कमी जागेत फिट बसतात आणि स्वयंपाक करताना थंड हवेसाठी मदतीचा हात देतात. मात्र गॅसजवळ ठेवताना काळजी घ्या.
3. इंडक्शन आणि मायक्रोवेव्हचा पर्याय : गॅसच्या शेगडीवर स्वयंपाक करताना जास्त उष्णता निर्माण होते. इंडक्शन कुकटॉप किंवा मायक्रोवेव्ह यांचा वापर केल्यास उष्णतेचा त्रास कमी होतो. यामुळे वीजेची बचत तर होतेच, पण पर्यावरणालाही फायदा होतो.
4. योग्य वेळ निवडा : दुपारी सूर्य सर्वाधिक प्रखर असतो. त्यामुळे शक्य असेल तेव्हा सकाळच्या वेळातच स्वयंपाक उरकणं हा सर्वोत्तम उपाय आहे. सकाळी हवाही थोडी गारसर असते आणि स्वयंपाक करताना उकाडा कमी जाणवतो.
उन्हाळ्यात स्वयंपाक ही एक परीक्षा असते, पण वरील सल्ल्यांनी तुमचं किचन थंड ठेवणं सहज शक्य आहे. थोडंसं नियोजन आणि स्मार्ट उपकरणांची मदत घेतली, तर तुम्ही घामाच्या धारा थांबवू शकता आणि स्वयंपाक करतानाही आराम अनुभवू शकता!