खोक्या भोसले ऊर्फ सतीश भोसले याला अखेर ढाकणे पितापुत्रांच्या मारहाणीप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर हरणाला मारल्याचाही आरोप आहे. कोर्टाने त्याला सहा दिवसाची कोठडी सुनावली आहे. खोक्या भोसलेला अटक करण्यात आल्यानंतर त्याच्या घरावर बुलडोझर फिरवण्यात आला आहे. त्यामुळे त्याचे कुटुंबीय आक्रोश करत आहेत. आम्ही रस्त्यावर आलोय. आमचा संसार उद्ध्वस्त झालाय. आम्ही कुठे जायचे?, असा टाहो खोक्या भोसलेची पत्नी तेजू भोसले यांनी फोडला आहे.
खोक्या ऊर्फ सतीश भोसले यांची पत्नी तेजू भोसले यांनी मीडियाशी संवाद साधला आहे. आमचं घर उद्ध्वस्त करून टाकलं, पाडून टाकलं, आम्ही रोडवर बसलो आहोत. आम्ही कुठे जायचं? आमच्यावर अन्याय झाला. खोटे गुन्हे आहेत ते. ते आम्हाला रानडुक्कर धरण्यासाठी बोलावून घेऊन गेले होते. आमच्या मुलीची छेड काढली. आमच्या मुलाला मारलं तरी सुद्धा आम्ही असं केलं नाही. आमचे मालक दिलीप ढाकणेला दवाखान्यात घेऊन गेले, आमच्या मुलीला मुलाला तिथेच ठेवलं. ते खोटे गुन्हे आहेत. त्यांना मारलं नाही, तिकडून फोन आल्यामुळे ते गेले होते, असं तेजू भोसले म्हणाल्या.
आमच्या मुलीला लय हाणलं
आमच्या पारधी समाजाचे ते कार्यकर्ते आहेत. सतीश भोसले मुकादम होते. मजुरांना देण्यासाठी पैसे आणले होते. व्हिडीओला लाइक मिळावा म्हणून त्यांनी व्हिडीओ शेअर केला होता, असं तेजू भोसले यांनी सांगितलं. अतिक्रमण सगळेच हटवून टाका. आमचं घर कस काय पाडलं? वन विभागाने आमच्या हातात नोटीस दिली नाही. सही पण घेतली नाही. तरी पण आमच घर पाडल. आम्ही रोडवर बसलोय. लेकरंबाळं आहेत. घर पाडलं म्हणून आम्हाला मान्य होतं, वन विभागाची जागा होती म्हणून. आमचे भांडे – कुंडे शेळ्या सगळं जाळलं. आमच्या बायांना सुद्धा हाणलं. आमच्या मुलीवर अत्याचार झाला. तिला लय हाणलं, असा टाहोच त्यांनी फोडला.
चार भाऊ होते
आमच्यावर अत्याचार केला. हाणामारी केली. मुलाला मुलीला सगळ्या फॅमिलीला हाणलं. ते सतीश भोसलेच घर होतं. सगळं कुटुंब राहत होतं. चार भाऊ राहत होते. चार-पाच भाऊ, 20 – 25 मुलं असतील आमच्या कुटुंबात, असंही त्यांनी सांगितलं.
म्हणून राग आला
माऊली खेडकरच्या पत्नीने आमच्या मालकाला बोलवून घेतलं. असं असं झालं म्हणून सांगितलं. ते म्हणाले माझ्या बायकोची छेड काढली. त्यांना राग सहन झाला नाही. असं का करताय म्हणून हाणलं. थोडंस हाणलं, असंही त्या म्हणाल्या.