ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादूल मुस्लिमीन (AIMIM) या पक्षाने राज्याच्या राजकारणात झंझावत आणला होता. खासदार, आमदार आणि पालिकांमध्ये चांगले यश मिळवले होते. मुंबई आणि मराठवाड्यात पक्ष मजबूत होत असतानाच आताच्या विधानसभा, लोकसभा निवडणुकीत पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही. पक्षातंर्गत कुरबुरी आणि कुरघोडी समोर आल्या. त्यानंतर आता पक्षातील बड्या नेत्याने सद्याच्या राजकीय स्थितीवर आसूड ओढत, असले राजकारण नको, त्यापेक्षा निवृत्ती बरी असे वक्तव्य केल्याने खळबळ उडाली आहे.
आता कुटुंबाला वेळ देणार
छत्रपती संभाजीनगराचे माजी खासदार इम्तियाज जलील यांचा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. त्यानंतर त्यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. पराभवानंतर काय करताय याबाबत त्यांना विचारले असता, त्यांनी मन मोकळे केले. लोकसभेला मी जेव्हा पराभूत झालो तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरने पैसे घेऊन आले होते. आणि विधानसभेच्या निवडणुकीत देखील भाजपने कसा पाऊस पडला होता पैशांचा त्यामुळे माझा पराभव झाला, असा आरोप त्यांनी पुन्हा केला.
या सर्व गोष्टींचे पुरावे आहेत आणि मी पत्रकार परिषद घेऊन देखील ते दिले आहेत, असे ते म्हणाले. दहा वर्ष मी खूप काम केले आता थोडं कुटुंबाला वेळ देण्याची गरज आहे त्यामुळे मी आता कुटुंबाला वेळ देत आहे, मुलांना सेटल करण्यासाठी वेळ देत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
राजकारणातून निवृत्त होणार?
माझी इच्छा तर आहे निवृत्तीची, कारण राज्यात खूप घाणेरडे राजकारण सध्या सुरू आहे. चांगल्या माणसांची किंमत नाही इथे लोक जाती आणि देशाच्या आधारावर मतदान करतात, अशी व्यथा त्यांनी मांडली. लोक तुमची काम तुमचा शिक्षण किंवा चारित्र्य बघून मतदान करणार नाही. लोक जर जाती आणि धर्माच्या आधारावर मतदान करणार असतील तरी खूप वाईट परिस्थिती महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झाली आहे. राजकारणात काही आयडियालॉजी राहिलेली नाही. पैशासाठी आणि सत्तेसाठी लोक इकडून तिकडे उड्या मारत आहेत, असा घणाघात त्यांनी घातला.
पैशामुळे माझा पराभव
जात आणि धर्म तुम्ही आपल्या राजकारणातून बाहेर काढू शकत नाही, असे मत त्यांनी मांडले. गेल्या विधानसभा निवडणुकीत मला 22 हजारपर्यंत गैर मुस्लिम लोकांनी मतदान केले. या निवडणुकीच्या निकालानंतर मला सर्वकाही संपलेला आहे असं वाटलं नाही, काहीतरी शिल्लक आहे. पैशांचा खेळ जर झाला नसता तर इम्तियाज जरील कदाचित 15 हजारांच्या मतांनी निवडून आलो असतो. त्यांचा पैसा आणि आमचे काम त्यामध्ये लोकांनी पैशाला जास्त प्राधान्य दिले त्यामुळे आमचा पराभव झाला, असा आरोप त्यांनी केला.
ज्या पक्षाकडे बघून लोक मतदान करतात मात्र तो उमेदवार पैसे बघून दुसऱ्या पक्षात उडी घेतो हे कितपत योग्य आहे, असा सवाल त्यांनी केला. सर्वात बोगस मतदान प्रक्रिया महाराष्ट्रात झाल्याचा आरोप त्यांनी केला. कुठला आमदार खासदार पाहिजे हे जर लोक ठरवतात तर लोकांच्या मनात शंका आहे की आम्हाला ईव्हीएम वर निवडणुका नको. हे कोण प्रशासक आहेत जे सांगतात की आम्ही ईव्हीएमवरच निवडणूक घेणार, असा सवाल त्यांनी केला.
मुस्लिम धर्मगुरूंना आवाहन
गेल्या निवडणुकीमध्ये मुस्लिम धर्मगुरूंनीच मुस्लिम समाजाचाच खूप मोठे राजकीय नुकसान केले आहे. कुणाच्याच दबावाखाली एमआयएम ने काम केले नाही की याचा फायदा होईल की तोटा असे ते म्हणाले. आज देशात मुस्लिम राजकारण संपलेले आहे, ते स्वत: जिंकण्यासाठी कधीच मैदानावर उतरत नाहीत, मोदी येईल या भीतीने इतर पक्षांना ते मतदान दिल जातं, असा आरोप त्यांनी केला.
चंद्रकांत खैरेंचे केले कौतुक
चंद्रकांत खैरे यांच्या प्रामाणिकतेला मी सलाम करतो, असे जलील म्हणाले. आजच्या राजकारणाच्या परिस्थितीत जे नैतिकता पाहिजे ती चंद्रकांत खैरे यांनी दाखवून दिलेली आहे. पक्षाचीनिष्ठा बाळगत ते प्रामाणिक राहिलेले आहेत. लोकसभेच्या पराभवानंतर ते दुसर्या पक्षात जाऊ शकत होते मात्र त्यांनी तसं केले नाही. मी त्यांचा राजकीय विरोधक असलो तरीही त्यांच्या याच गोष्टीचा मी कौतुक करणार, असे ते म्हणाले. बाळासाहेब ठाकरेंनी खूप लोकांना मोठं केलेला आहे मात्र वेळ आल्यावर याच लोकांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. महाराष्ट्र मध्ये एकेकाळीची नैतिकता होती ती आता संपलेली आहे, यावर त्यांनी कटाक्ष टाकला.