मोठी बातमी! अखेर कुणाल कामराची होणार चौकशी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल विडंबनात्मक गाणं सादर केल्याप्रकरणी अखेर कॉमेडियन कुणाल कामराची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. कुणालची चेन्नईमध्ये चौकशी करण्यास मुंबई पोलिसांना परवानगी देण्यात आली आहे. मुंबई पोलीस चेन्नईला जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने कुणाल कामराचा जबाब नोंदवणार आहेत. या प्रकरणात पोलीस कामराला प्रत्यक्ष पोलीस ठाण्यात उपस्थित राहून जबाब नोंदविण्यास समन्स पाठवत आहेत. परंतु कामरा पहिल्या दिवसापासून व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे आपला जबाब नोंदवण्यास तयार आहे, असा युक्तीवाद त्याच्या वकिलांनी सुनावणीदरम्यान केला होता. त्यानंतर चेन्नईला जाऊन त्याची चौकशी करण्याची परवागनी मुंबई पोलिसांना देण्यात आली आहे.

आपल्याविरोधात दाखल गुन्हे रद्द करण्याच्या मागणीसाठी कुणालने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. कामराला शिवसेनेच्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. त्यानंतरही त्याने चौकशीसाठी वैयक्तिकरित्या उपस्थित राहण्याचा पोलिसांचा आग्रह असून त्यासाठी कामराला तीन वेळा समन्स बजावल्याचा दावा त्याचे वकील नवरोज सिरवाई यांनी केला. कामरा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पोलिसांना सहकार्य करण्यास तयार असतानाही त्याच्या वैयक्तिक उपस्थितीची पोलिसांची मागणी अतार्किक असल्याचंही सिरवई यांनी न्यायालयाला सांगितलं होतं. या सुनावणीनंतर न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या खंडपीठाने कामराच्या याचिकेवरील निर्णय राखून ठेवला होता. तसंच याचिकेवरील निर्णयापर्यंत कामराला अटकेच्या कारवाईपासून संरक्षण दिलं होतं.

दरम्यान कुणाल कामराला समन्स बजावल्यानंतर त्याच्या माहीम इथल्या घरी मुंबई पोलिसांचं पथक गेलं होतं. पोलिसांनी कामराला चौकशीला उपस्थित राहण्यासाठी समन्स बजावलं होतं. पण तो अनुपस्थित राहिला होता. त्यामुळे पोलीस पथक कामराच्या घरी पाहणी करण्यासाठी गेलं होतं. या पाहणीवरूनही कुणालने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली होती. या पोस्टमधून त्याने अधिकाऱ्यांवर वेळ आणि सार्वजनिक संसाधनांचा अपव्यय केल्याबद्दल जोरदार टीका केली होती. कामराने किमान दहा वर्षांपासून त्या पत्त्यावर राहत नसल्याचं सांगून तामिळनाडूतील त्याच्या सध्याच्या घराच्या टेरेसवरून स्वत:चा एक फोटो शेअर केला होता.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)