पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातून धक्कादायक प्रकार समोर आला होता. प्रसुतीसाठी आलेल्या महिलेच्या कुटुंबाकडे डिपॉझिट म्हणून तब्बल दहा लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. कुटुंबाने अडीच लाख रुपये भरण्याची तयारी देखील दर्शवली होती, मात्र या महिलेला दाखल करून घेण्यात न आल्यानं वेळेत उपचार मिळू शकला नाही, आणि तिचा मृत्यू झाला असा आरोप तिच्या कुटुंबाकडून करण्यात आला होता. तनिषा भिसे असं मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे, या घटनेनंतर राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे.
दरम्यान शासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालामध्ये देखील या रुग्णालयावरच ठपका ठेवण्यात आला आहे. त्यानंतर या हॉस्पिटलचे डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा रुग्णालयाचे संचालक डॉ. धनंजय केळकर यांच्याकडे सोपवला होता. आता या प्रकरनानंतर पिंपरी चिंडवड महापालिकेनं मोठा निर्णय घेतला आहे. 650 रुग्णालयांना नोटीस पाठवण्यात आली आहे.
तनिषा भिसेंच्या मृत्यूनंतर पिंपरी महापालिकेनं तब्बल 650 रुग्णालयांना नोटिसा पाठवल्या आहेत. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने उपचारापूर्वी ऍडव्हान्ससाठी मुजोरी दाखवली आणि तनिषा भिसे यांचा या प्रकरणात बळी गेला. यानंतर आता महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून 650 रुग्णालयांना नोटीस पाठवण्यात आली आहे. कोणत्याच रुग्णांकडून ऍडव्हान्स घेऊ नका, असं घडल्यास रजिस्ट्रेशन रद्द करण्यात येईल.असा इशारा पालिकेने या नोटीसीद्वारे रुग्णालयांना दिला आहे.
दरम्यान या प्रकरणात आता भाजप आमदार अमित गोरखे यांनी मोठी मागणी केली आहे. धर्मादाय आयुक्त आणि यमुना जाधव यांच्या एकत्रित समितीचा अहवाल त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवला आहे, त्यामुळे तो अहवाल मला पाहायला मिळाला नाही. मात्र माता मृत्यू अहवाल अद्याप येणं बाकी आहे, तो आज येण्याची शक्यता आहे. येणारे सगळे अहवाल हे भिसे कुटुंबियांच्या बाजूने असतील. मंगेशकर कुटुंबीयांनी सामाजिक भान ठेवत, त्या दोन्हीही बालकांचे पालकत्व 18 वर्षापर्यंत स्वीकारावं अशी माझी वैयक्तिक मागणी आहे, असं गोरखे यांनी म्हटलं आहे.