महराष्ट्रात सध्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन राजकारण तापलं आहे. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोर शासन व्हावं, त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी महाराष्ट्रात मोर्चे निघत आहेत. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि बीड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी हा विषय लावून धरला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा संबंध मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी जोडला जात आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत सात आरोपींना अटक झाली आहे. वाल्मिक कराड या हत्येचा मुख्य मास्टरमाईंड असल्याचा आरोप केला जातोय. त्याला खंडणीच्या गुन्ह्यात अटक झाली आहे. हा वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे. म्हणूनच या सगळ्या प्रकरणाशी त्यांचा संबंध जोडला जातोय.
या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी होत आहे. कारण धनंजय मुंडे मंत्रिपदावर राहिल्यास निष्पक्ष तपास होणार नाही, पोलीस यंत्रणेवर दबाव येईल असं विरोधी पक्षाच म्हणणं आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी नेमण्यात आली होती. त्यातून एक पीएसआय, हवालदार आणि अजून एकाला हटवलं. कारण पीएसआयचा वाल्मिक कराडसोबत सेलिब्रेशन करतानाचा फोटो समोर आला होता. त्यामुळे तपास पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदापासून दूर व्हावं अशी विरोधी पक्षांची मागणी आहे.
राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण
बीड जिल्ह्यातील आष्टीचे आमदार सुरेश धस हे तर रोज पत्रकार परिषदा घेऊन धनंजय मुंडे यांना टार्गेट करत आहेत. आतापर्यंत त्यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. धनंजय मुंडे यांची त्यांनी राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न चालवला आहे. दरम्यान आता एक मोठी बातमी आहे. हेच भाजप आमदार सुरेश धस उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेण्यासाठी देवगिरी बंगल्यावर गेले आहेत. त्यांच्यासोबत आमदार रत्नाकर गुट्टे सुद्धा आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर भाजप आमदार सुरेश धस , रत्नाकर गुट्टे तिघांची बैठक सुरु आहे. सुरेश धस अचानक अजित पवार यांच्या भेटीला पोहोचल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.