मोठी बातमी! महायुतीचं खातेवाटप ठरलं? नव्या मंत्र्यांच्या शपथविधी पूर्वीच महत्त्वाची माहिती समोर, पाहा कोणाला कोणतं खातं मिळणार?

5 डिसेंबर रोजी नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला, नव्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार रखडल्याचं पाहायला मिळालं. मंत्रिमंडळाचा विस्तार रखडल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं होतं. मात्र अखेर आज मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळालं असून, नागपुरात नव्या मंत्र्यांचा शपथ ग्रहण सोहळा पार पडणार आहे. यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.समोर आलेल्या माहितीनुसार आतापर्यंत महायुतीमधील 39 आमदारांना मंत्रि‍पदाची शपथ घेण्यासाठी फोन करण्यात आला आहे, ज्यामध्ये भाजपचे सर्वाधिक 20, राष्ट्रवादी काँग्रेसचे 9 तर शिवसेना शिंदे गटाच्या 10 आमदारांचा समावेश आहे.

दरम्यान खातेवाटपाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना शिदे गट गृह मंत्रि‍पदासाठी आग्रही होता, मात्र हे खातं भाजपकडेच राहणार असल्याची माहिती आहे.गृहमंत्रालयासोबतच भाजपकडे महसूल, शिक्षण आणि पाठबंधारे ही खाती राहणार असल्याची शक्यता आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये.

भाजप विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकत मोठा पक्ष ठरला, भाजपनं 132 जागा जिंकल्या. तर शिवसेना शिंदे गटाला 57 आणि अजित पवार गटाला 41 जागा मिळाल्या. सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीप्रमाणे शिवसेना शिंदे गटाला नगर विकास मंत्रालयासोबत गृहनिर्माण, उद्योग, आरोग्य, वाहतूक, पर्यटन, आयटी आणि मराठी भाषा ही खाती मिळण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला अर्थ मंत्रालयासोबत, क्रीडा आणि सहकार खातं मिळण्याची शक्यता आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)