Chandrahar Patil Meets Eknath Shinde : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. युती आणि आघाड्यांची गणितं जुळवली जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शिंदे यांच्याकडून राज ठाकरे यांच्याशी हातमिळवणी करण्याचा प्रयत्न केला जातोय. गेल्या काही दिवसांत काही माजी आमदार तसेच नेते आणि पदाधिकाऱ्यांनी आपापल्या सोईच्या पक्षांत प्रवेश केला आहे. असे असतानाच आता महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी घडामोड समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीत ज्या नेत्यासाठी महाविकास आघाडीत तणाव निर्माण झाला होता, त्याच चंद्रहार पाटील आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली आहे. या भेटनंतर आता राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
उदय सामंतांची शिष्टाई, चंद्रहार पाटील-शिंदे यांच्यात भेट
चंद्रहार पाटील हे पैलवान असून सध्या ते उद्धव ठाकरे यांच्या पक्षात राज्य संघटक या पदावर आहेत. मिळालेल्या माहितीनुसार चंद्रहार पाटील आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली आहे. गुरुवारी (24 एप्रिल) रात्री उशिराने ही भेट झाली आहे. उदय सामंत यांनीच चंद्रहार पाटील आणि एकनाथ शिंदे यांची भेट घडवून आणल्याचं म्हटलं जातंय. या भेटीवर चंद्रहार पाटील यांनी प्रतिक्रियादेखील दिली आहे. मी वैयक्तिक कामासाठी गेलो होतो. त्यावेळी माझी आणि उदय सामंत याची भेट झाली, असं चंद्रहार पाटलांनी सांगितलं आहे.
चंद्रहार पाटलांसाठी ठाकरेंनी लावली होती ताकत
2024 सालच्या लोकसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेने चंद्रहार पाटील यांना सांगली या मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. या जागेसाठी काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना यांच्यात चांगलीच रस्सीखेच झाली होती. शेवटपर्यंत दोन्ही पक्षांनी ही जागा मिळवण्यासाठी प्रयत्न केला होता. शिवसेना माघार घेण्यास तयार नसल्याचे समजल्यानंतर शेवटी काँग्रेसने एक पाऊल मागे घेत ही जागा ठाकरेंना दिली होती. ही जागा जिंकण्यासाठी ठाकरेंनी चांगलीच ताकद लावली होती. मात्र चंद्रहार पाटलांना फक्त 55 हजार मतं मिळाली होती.
विशाल पाटलांनी मारली होती बाजी
याच मतदारसंघातून काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी तयारी केली होती. शेवटी पक्षाने तिकीट न दिल्यानं ते अपक्ष म्हणून उभे राहिले होते. त्यांनी तब्बल पाच लाख 69 हजार मतं मिळवत चंद्रहार पाटील तसेच भाजपाचे उमेदवार संजयकाका पटील यांना धूळ चारली होती. आता ज्या चंद्रहार पाटलांसाठी ठाकरेंनी ताकत पणाला लावली होती, आता तेच एनकाथ शिंदे यांच्या भेटीला गेल्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.