धनंजय मुंडे यांच्या अडचणी काही थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. आता मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मंत्री धनंजय मुंडे यांनी शपथपत्रामध्ये खोटी माहिती दिल्याचा आरोप करुणा शर्मा यांनी केला होता. या प्रकरणात त्यांनी ऑनलाई पद्धतीनं तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल न्यायालयाकडून घेण्यात आली आहे, न्यायालयानं धनंजय मुंडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. आता या प्रकरणात पुढील सुनावणी येत्या 15 मार्च रोजी होणार आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मंत्री धनंजय मुंडे यांनी शपथपत्रामध्ये खोटी माहिती दिल्या बाबतची तक्रार करुणा शर्मा यांनी ऑनलाईन पद्धतीने दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाने धनंजय मुंडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली, याबाबत आता 15 मार्च रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
मंत्री धनंजय मुंडे यांनी 2024 मध्ये परळी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जा सोबतच्या शपथपत्रात पत्नी राजश्री मुंडे आणि तीन मुली तसेच करुणा शर्मा यांच्या दोन मुलांचा उल्लेख केला होता. मात्र करुणा शर्मा यांच्या नावावरील मिळकतीबाबत कुठलाही उल्लेख केला नव्हता. त्यांनी ही माहिती दडवल्याबाबत शर्मा यांनी तक्रार केली होती. आता याप्रकरणात पुढील सुनावणी 15 मार्च रोजी होणार आहे.
दरम्यान दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित विद्रोही साहित्य संमेलनामध्ये धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा ठराव घेण्यात आला आहे. विद्रोही साहित्य संमेलनामध्ये एकूण 29 ठराव घेण्यात आले, त्यामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात यावा, असा ठराव देखील घेण्यात आला आहे. त्यामुळे मुंडेंच्या अडचणीत आणखीनच भर पडली आहे.
धनंजय मुंडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर विरोधकांकडून त्यांच्या कोंडीचा प्रयत्न सुरू आहे, धनंजय मुंडे यांनी नैतिकता म्हणून राजीनामा द्यावा अशी मागणी होत आहे, त्यातच आता विद्रोही साहित्य संमेलनामध्ये देखील धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा ठराव घेण्यात आला आहे.