ठाणे महापालिकेतील शिक्षण विभागाचा मोठा निर्णय, तब्बल 81 शाळांना करणार सील, कारण…

ठाणे महापालिका हद्दीत तब्बल 81 अनधिकृत शाळा असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या शाळांमध्ये १९७०८ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाने 68 शाळांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून उर्वरित १३ अनधिकृत शाळांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच अनधिकृत शाळांतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी त्यांचे इतर अधिकृत शाळांमध्ये त्यांचे समायोजन करण्यासाठी ठाणे महापालिकेने प्रयत्न सुरू केले आहे.

ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी अनधिृकत शाळांच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली होती. काही दिवसांपूर्वी ही आढावा बैठक संपन्न झाली होती. त्यामध्ये काही शाळांची नोंदणी नाही, काही अनधिकृत शाळा अनधिकृत इमारतीत आहेत, अनधिकृत शाळा निवासी इमारतीत भाड्याच्या जागेत असल्याची माहिती शिक्षण उपायुक्त सचिन सांगळे यांना मिळाली. त्यानंतर शिक्षण हक्क कायद्यानुसार या अनधिकृत शाळांना ५२ कोटी रुपयांचा दंडही करण्यात आल्याचेही उपायुक्त सांगळे यांनी सांगितले.

सर्वतोपरी मदत करण्याची भूमिका

मात्र अनधिकृत शाळांपैकी सर्वात जास्त शाळांची संख्या दिवा प्रभाग समिती क्षेत्रात आहेत. त्या अनुषंगाने दिवा प्रभाग समितीने या अनधिकृत शाळांविरुद्ध कार्यवाही सुरू केलेली आहे. आतापर्यंत ३२ अनधिकृत शाळांची नळ जोडणी खंडित केली आहे. या अनधिकृत शाळांच्या बाबतीत शहर विकास विभागाकडील अनधिकृत बांधकामाच्या यादीनुसार अतिक्रमण विभागाकडूनही कार्यवाही सुरु आहे. ज्या अनधिकृत शाळा नियमित होऊ शकतील, त्यांना सर्वतोपरी मदत करण्याची भूमिका महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी मांडली आहे.

19 खाजगी शाळांकडून तयारी

या 81 पैकी 05 शाळांनी त्या दृष्टीने आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याचा प्रस्ताव दिला आहे. उर्वरित 76 शाळांकडून असा कोणताही प्रस्ताव आलेला नाही. त्यांना आणखी एक संधी द्यावी, असे निर्देश आयुक्त राव यांनी दिले आहेत. त्याचबरोबर, विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी त्यांना जवळच्या अधिकृत शाळांमध्ये प्रवेश देण्याचाही विचार केला जात आहे. त्यासाठी 19 खाजगी शाळांनी तयारी दाखवली असल्याचे विजय साळवी शिक्षण विभाग अधिकाऱ्यांनी दिले आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)