तिरडी आंदोलनImage Credit source: टीव्ही ९ मराठी
स्वारगेट बस स्थानाकात बलात्कार प्रकरणात गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या वक्तव्याने सामाजिक संघटना आणि राजकीय नेत्यांनी संताप व्यक्त केला. या प्रकरणात नवनवीन दावे आणि खुलासे करण्यात येत असताना पुण्यात महिला जागर समितीकडून तिरडी आंदोलन करत या अत्याचार प्रकरणाचा निषेध करण्यात आला. आरोपी दत्ता गाडे याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी महिला आंदोलकांनी केली आहे.
पुण्यात स्वारगेट बसस्थानकात फलटण येथे जाण्यासाठी भल्या पहाटे तरुणी आली होती. तिला एका बसमध्ये नेत आरोपीने बलात्कार केला होता. याची माहिती तरुणीने मित्राला दिली. त्याने तिला पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास सांगितले. त्यानंतर घटना उजेडात आली. हे प्रकरण समोर आल्यापासून आरोपी फरार होता. त्याला ऊसाच्या शेतातून पोलिसांनी मध्यारात्री अटक केली.
आरोपीच्या वकिलांनी हा सर्व प्रकार संमतीतून झाल्याचा आणि दोघेही एकमेकांना ओळखत असल्याचा दावा केल्याने वादाची ठिणगी पडली. या दोघांमध्ये साडेसात हजार रुपयांच्या व्यवहार झाल्याचा दावा सुद्धा करण्यात येत आहे. तर दुसरीकडे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सदर घटना घडली त्यावेळी या एसटी जवळ दहा ते पंधरा लोक हजर होते. तरुणीने आरडाओरड केली नाही, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली.
आंदोलनकर्त्या आक्रमक
आज या घटनेचा आणि आरोपीचा महिला जागर समितीकडून तीव्र निषेध करण्यात आला. इतकेच नाही तर आंदोलनकर्त्या महिलांनी गृहराज्यमंत्र्यांचे वक्तव्य हे असंवेदनशील असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी राज्यात स्त्रीयावरील अत्याचारात वाढ झाल्याचे आणि कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
गु्न्हेगारांवरती कारवाई करा
सुरक्षा कक्षाच्या काचा फोडल्या आहेत त्या भरुन देता येतील पण तरुणीच्या चारित्र्याच्या काचा फुटल्या त्याच काय? असा सवाल शिवसेना नेते वसंत मोरे यांनी केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमच्यावरती कारवाई करण्यापेक्षा गुन्हेगारांवरती कारवाई करा अशी मागणी वसंत मोरे यांनी केली. आमच्यावरती कारवाई झाली तरी हरकत नाही अस्वलाच्या अंगावर एक केस वाढल्याने फरक पडत नाही. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री असलेल्या अजित पवार यांनी शहराच्या सुरक्षेतेकडे लक्ष द्यावं, असे मोरे म्हणाले. स्वारगेट बस स्थानकातील बलात्कार संदर्भातील आरोपीच्या वकिलाचे स्टेटमेंट हे प्रसिद्धीसाठी असल्याचा आरोपी ही त्यांनी केला.