ठाणे-घोडबंदर रोडवरून मिरा-भाईंदरच्या किंवा वसई-विरारच्या दिशेला येणाऱ्या व ठाण्याकडे जाणाऱ्या वाहनांच्या संख्येत मागच्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्याच्या तुलनेत हा रस्ता अरुंद असून, अनेक वळणे आहेत. त्यामुळे नेहमीच घोडबंदर मार्गावर वाहतूक कोंडी होते. अनेकदा अवजड वाहनांचे अपघात घडतात. या समस्येमुळे मिरा-भाईंदरकरांसह ठाणेकर त्रस्त झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर फाऊंटन हॉटेल ते गायमुखपर्यंतचा सुमारे सहा किमीचा ३० मीटर इतका असणारा रस्ता ६० मीटर इतका रुंद करण्याची मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली होती. या प्रकल्पाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मंजूरी दिली आणि रस्त्याची पाहणी करत अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले होते. त्यानुसार मिरा-भाईंदर पालिका आयुक्त संजय काटकर एमएमआरडीएचे अधिकारी विनायक सुर्वे व इतर काही अधिकाऱ्यांनी नुकताच रस्त्याची पाहणी करत आढावा घेतला.
या रस्त्याचे काम ‘एमएमआरडीए’च्या माध्यमातून केले जाणार आहे. त्याकरिता ९० टक्के खासगी तर १० टक्के इतकी वन विभागाची जमीन हस्तांतरित करावी लागणार आहे. ही कार्यवाही पूर्ण झाल्यानंतरच रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे. तद्नंतर प्रस्तावित गायमुख ते काशिमिरा मेट्रोचे कामही हाती घेता येणार असल्याचे सरनाईक म्हणाले.
रस्त्यालगत सायकल ट्रॅकची उभारणी
गायमुख ते फाउंटन हॉटेलपर्यंत रस्ता रुंदीकरण करताना रस्त्याच्या कडेला तीन मीटर जागेत सायकल ट्रॅक तयार केला जाणार आहे. ठाणे ते फाउंटन हॉटेलदरम्यान असा हा जवळपास १० किमीचा सायकल ट्रॅक असेल, अशी माहिती सरनाईक यांनी दिली.