संजय राऊत, चंद्रकांत पाटीलImage Credit source: TV 9 Marathi
शिवसेना उबाठा खासदार संजय राऊत हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर सातत्याने टीका करत असतात. त्याबाबत भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सत्तेसोबत यायचंय. पण त्यांना कोणी घेत नाही. त्यामुळे अमित शाह यांच्यावर संजय राऊत वारंवार टीका करतात. आता शिवसेना उबाठा देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या मागे लागून आली नाही तर मुंबई महानगर पालिका निवडणुकीत त्यांना उमदेवार मिळणार नाही, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला. हे आपले विश्लेषण असल्याचे त्यांनी सांगितले.
चंद्रकांत पाटील म्हणाले, अमित शाह यांच्या दौऱ्याच स्वागत करायचे सोडून संजय राऊत टीका करतात. त्यांना कुणी प्रतिसाद देत नाहीत. अमित शाह यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल 500 पानांचे पुस्तक येत आहे. ते वाचल्यावर राऊत यांना अमित शाह यांचा शिवाजी महाराज यांचाबद्दलचा अभ्यास समजेल. त्या पुस्तकाचे लवकरच प्रकाशन होईल, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
राऊत यांनी फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेबद्दल चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, संजय राऊत जे म्हणतील ते खरे आहे, असे म्हणण्यापेक्षा खोट आहे, असेच म्हणता येईल. राज्यातील 235 आमदारांनी देवेंद्रजींना मुख्यमंत्री केले. सर्वमान्य व्यक्तीमत्व महाराष्ट्रात मुख्यमंत्री आहे. आरक्षण नसतानाही सुविधा देण्याच्या योजना फडणवीस यांनी सुरु केली. दलित, मराठी, ओबीसी देवेंद्रजी विरोधात जाऊ शकत नाहीत. परंतु संजय राऊत यांच्या मनातील हा जातीवाद आहे. तो व्यवहारात येऊ शकणार नाही. राज्यात मराठे मुख्यमंत्री होते. त्यांनी मराठा समाजास आरक्षण दिले नाही, पण फडणवीसांनी दिले. ते कधी जातीवाद करत नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
देवेंद्रजींनी 2014 ते 20 19 आरक्षणाची सुविधा दिली. त्यापूर्वी मराठा समाजास आरक्षण नसतानाही सुविधा दिल्या. वसतीगृह केली. भत्ता दिला. त्यांच्याविरुद्ध दलित, मराठा, ओबीसी जाऊ शकत नाही. ओबीसी मंत्रालय देवेंद्रजींनी सुरू केले. देवेंद्र फडणवीस विरुद्ध फुले आंबेडकर अशा प्रकारचा वाद संजय राऊत यांच्या मनात आहे. हा त्यांच्या मनामध्ये असलेला जातीवाद आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
शिवसेना उबाठामधील आऊट गोईंगसंदर्भात बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, महापालिकेतील तुमचे लोक सोडून जात आहे. मुंबईत तुमचे 57 सिटींग नगरसेवक शिंदेंकडे गेले. पुण्यात 5 नगरसेवक भाजपत आले, त्यामुळे पक्षाकडे लक्ष द्या, असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी राऊत यांना दिला. महायुतीत खूप अलबेल आहे, सगळी माणस एकत्र काम करत आहेत, असे त्यांनी सांगितले.