दिल्लीत गेलेले ठाकरे मोठा डाव टाकण्याच्या तयारीत; मित्रपक्ष काय करणार?
मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दिल्लीच्या दौऱ्यावर गेलेले शिवसेबा उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेणार आहेत. उद्धव ठाकरे कालच दिल्लीत पोहोचले आहेत. त्यांचा दौरा तीन दिवसांचा असणार आहे. या दौऱ्यात ते काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, राष्ट्रवादी (शप)चे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतील.                विधानसभा निवडणूक अवघ्या दोन महिन्यांवर आलेली आहे. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीनं आपल्याला मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून घोषित करावं, अशी मागणी ठाकरेंकडून महाविकास आघाडीतील मित्रपक्षांकडे केली जाण्याची शक्यता आहे. तसं वृत्त द न्यू इंडियन एक्स्प्रेसनं दिलं आहे. शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊतांनी याआधी अशीच भूमिका मांडली आहे. आता काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत उद्धव ठाकरे त्यांचीच री ओढण्याची शक्यता आहे.
उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरवतील, अशी माहिती खासदार संजय राऊतांनी काल दिली. ‘लोकसभेत केलेल्या कामगिरीची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत करुन आम्हाला राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आणायची आहे. त्यासाठी वरिष्ठ नेत्यांची होणारी बैठक महत्त्वाची आहे,’ असं राऊत म्हणाले होते.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं राज्यात ४८ पैकी ३० जागा जिंकत मोठी मुसंडी मारली. तर सत्ताधारी महायुतीला केवळ १७ जागांवर समाधान मानावं लागलं. विधानसभा निवडणुकीसाठी मविआनं आपल्याला मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून घोषित करावं यासाठी ठाकरे आग्रही असल्याची माहिती ठाकरे गटातील सुत्रांनी दिल्याचं द न्यू इंडियन एक्स्प्रेसनं आपल्या वृत्तात म्हटलं आहे.
‘लोकसभा निवडणुकीत आम्हाला काँग्रेस, शरद पवार गटापेक्षा कमी जागा मिळाल्या असल्या तरीही उद्धव ठाकरेच प्रचाराचा चेहरा होते ही बाब कोणीही नाकारु शकत नाही. ठाकरेंची भाषणं मतदारांना भावली. भाजपनं ठाकरेंचं सरकार उलथवून लावलं. पण आता राज्यातील जनता ठाकरेंना पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदी पाहण्यास उत्सुक आहे,’ असं ठाकरेसेनेच्या नेत्यानं नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितलं.

‘ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित केल्यास पक्ष संघटना चार्ज होईल. शिवाय मतदारांमध्ये चांगला संदेश जाईल. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस असे पर्याय मतदारांसमोर असल्यास मविआला निश्चित फायदा होईल. त्यामुळे मविआनं ही संधी दवडू नये,’ असं ठाकरेसेनेचा नेता म्हणाला.