कॅप्टन एकनाथ शिंदे, वॉईस कॅप्टन अजित पवार
देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणाच्या सुरवातीला शासकीय प्रोटोकॉलनुसार ओळख न करून देता महाराष्ट्र सरकारचे कॅप्टन एकनाथ शिंदे, वॉईस कॅप्टन अजित पवार अशा क्रिकेटच्या शैलीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ओळख करून दिली. तर अंपायर म्हणून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर व विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या नावाचा उल्लेख केला आहे.
रोहित शर्मा यांनी आनंद आणि दु:खसोबतच दिलं
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खेळाडूंचे कौतुक केलं असून रोहित शर्माच्या निवृत्तीबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले की. ” कॅप्टन रोहित शर्मा यांनी एकाच दिवशी आपल्याला आनंद आणि दु:ख दिलं. परंतु रोहित शर्मा यांचं नाव हे भारतीय क्रिकेटमध्ये कायम गाजत राहील. कपिल देव आणि धोनीनंतर रोहित शर्मा यांनी आपल्याला हा विश्वकप जिंकून दिला आहे”.
सूर्यकुमार यादव हा ‘उगवता’ सूर्य
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की,”सूर्यकुमार यादव यांच्या नावातच ‘सूर्य’ आहे. आणि ते ‘उगवता’ सूर्य आहेत. सूर्यकुमार यादव यांनी पकडलेला कॅच कोणीच विसरू शकत नाही”.असे म्हणत सूर्यकुमार यादवचे कौतुक केलं आहे.
सूर्याने मराठीतून केलं भाषण
सूर्याने मराठीतून भाषण केलं आहे तो म्हणाला की, ”सीएम सर तुमचे धन्यवाद ही संधी दिलीत. व्यासपीठावर उपस्थित सर्वांचे धन्यवाद. तुम्हा सर्वांना भेटून खुप छान वाटते. जे मी काल बघितले ते मी कधीच विसरू शकत नाही. आणि आता मी जे इथे पाहतोय तेही मी कधी विसरू शकणार नाही. खुप खुप धन्यवाद”.
खेळाडूंना १ कोटी रुपयांचे बक्षीस
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा, शिवम दुबे , सूर्यकुमार यादव, यशस्वी जैस्वाल यांचा सन्मान करण्यात आला. तसेच या चारही खेळाडूंना प्रत्येकी १ कोटी रुपयांचे बक्षीस महाराष्ट्र सरकारच्या वतीने देण्यात आले आहे.