Teachers Salary Stopped: राज्यातील शिक्षकांचा पगार रखडला असल्याचा बातम्या आल्या आहेत. त्यामुळे त्यासंदर्भात गुरुवारी पुण्यात राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. महिन्याला मिळणारा पगार हा नाजूक विषय असल्यामुळे त्याची गंभीर दखल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट घेतली. त्यांनी माध्यमांसमोरच थेट अर्थ विभागातील अधिकाऱ्यांना फोन लावला. पगाराचा निधी दिला गेला का नाही? यासंदर्भात खातरजमा केली. त्यावेळी अर्थ विभागातील अधिकाऱ्यांनी पगाराचा निधी दिला गेल्याचे सांगितले. अजित पवार यांच्या या कार्यशैलीचे चांगलेच कौतूक होऊ लागले आहे.
फोन लावला अन् खुलासा केला…
अजित पवार यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना शिक्षकांचा पगार झाला नसल्याचे पत्रकारांनी सांगितले. त्यामुळे अजित पवार म्हणाले, काम करणाऱ्या प्रत्येक घटकाचे पगार वेळेवर झाले पाहिजे. जर पगार झाले नसतील तर ताबडतोब कसे होतील, त्यासंदर्भात पावले उचलणार आहे. त्याचवेळी त्यांनी थेट अर्थविभागातील अधिकाऱ्यांना फोन लावला. त्यांना शिक्षकांचा पगाराचा निधी दिला गेला की नाही? यासंदर्भात विचारणा केली. अधिकाऱ्यांनी निधी दिला गेला असल्याचे उत्तर दिले.
आता शिक्षण सचिवांशी बोलणार
अधिकाऱ्यांशी संवाद झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले, पगाराचे सर्व पैसे संबंधित विभागाला दिले आहेत. आता कुठे पगार झाले नाही त्या त्या विभागात पगार देत असताना काही त्रूटी किंवा काही अंतर्गत प्रश्न असले तर पगार रखडले असतील. परंतु आता यावर शिक्षण सचिवांशी बोलतो. कोणाचाही पगार राहता कामा नये, असे स्पष्टपणे सांगतो, असे अजित पवार यांनी म्हटले.
नोकरदार वर्गास दर महिन्याला मिळणाऱ्या पगारावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. त्यांचा घरखर्च ते वेगवेगळे हप्ते त्या पगारावर असतात. त्याची जाणीव अजित पवार यांना आहे. त्यामुळे ज्या वेळी हा विषय कानावर आला त्यांनी तातडीने त्या प्रश्नाचे उत्तर शोधले. विभागाकडून पैसे दिले गेल्याचे समजल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर समाधानही दिसत होते. अर्थमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळणाऱ्या अजित पवार यांची ही कार्यशैली तमान नोकरदार वर्गाला आवडली.