Tamhini Ghat: निष्ठुर नियती! स्वप्नीलची पाण्यात उडी अन् बापाचा अखेरचा क्षण लेकीकडून रेकॉर्ड

पुणे: भुशी डॅम येथील दुर्घटनेत एकाच कुटुंबातील पाच जणांनी आपला जीव गमावला. त्यानंतर ताम्हिणी घाट येथेही एक तरुण धबधब्याच्या पाण्यात वाहून गेल्याने त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. स्वप्नील धावडे नावाचा हा तरुण मुलांना ट्रेकिंगसाठी ताम्हिणी घाटात घेऊन गेला होता. तिथे तो पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. हृदयद्रावक म्हणजे जेव्हा हे सारं घडलं तेव्हा त्याची मुलगी तिथेच होती. तिनेच त्याचा वाहून जातानाचा व्हिडिओ मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केला. स्वप्नील धावडे हे बॉक्सिंगचे राष्ट्रीय खेळाडू असून त्यांनी भारतीय सैन्य दलातही सेवा दिली.

निघण्यापूर्वी आणखी एक व्हिडिओ काढ अन् तोच क्षण ठरला अखेरचा

या घटनेबाबत एक मन हेलावणारी माहिती समोर आली आहे. ताम्हिणी घाटातून सर्वजण निघण्याच्या तयारीत असताना स्वप्नील यांनी आपल्या मुलीला पाण्यात उडी मारतानाचा व्हिडिओ काढ असे सांगितले. तोच व्हिडिओ काढत असताना स्वप्नील हे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. त्यांच्या आयुष्यातला तो अखेरचा व्हिडिओ ठरला. डोळ्या देखत आपले वडील वाहून गेल्याने मुलीला मोठा धक्का बसला आहे.
Pune News: भुशी डॅम दुर्घटनेनंतर ताम्हिणी घाटात तरुण वाहून गेला, अंगावर काटा आणणारा VIDEO

पाहा तो दुर्दैवी VIDEO

अंगावर शहारे आणणारी ही घटना पिंपरी चिंचवड परिसरातील भोसरी भागामध्ये घडली आहे. स्वप्नील धावडे हे एक वर्षापूर्वीच आर्मीमधून सेवानिवृत्त झाले होते. त्यानंतर ते भोसरी परिसरामध्ये स्विमिंग आणि व्यायामाचे ट्रेनिंग देण्याचे काम करत होते. शनिवारच्या सुमारास ताम्हिणी घाटामध्ये असणाऱ्या प्लस व्हॅली परिसरामध्ये ते ३२ जणांचा ग्रुप घेऊन ट्रेकिंगसाठी गेले होते. दिवसभर ट्रेकिंग केल्यानंतर निघण्याच्या वेळी त्यांनी आपल्या मुलीला माझा पाण्यात उडी मारतानाचा व्हिडिओ काढ, असे सांगितले. या व्हिडिओमध्येच स्वप्नील धावडे हे वाहून जातानाचा क्षण कैद झाला.

सोमवारी संध्याकाळी त्यांच्यावर रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. धावडे यांच्या कुटुंबामध्ये आता कोणीही पुरुष व्यक्ती नाही. स्वप्नील धावडे यांच्या पश्चात कुटुंबात आई, पत्नी आणि मुलगी या तिघीच राहिल्या आहेत. स्वप्नील धावडे यांच्या जाण्याने धावडे कुटुंब पूर्णतः कोलमडले आहे.