पोलिसांनी दत्ता गाडेला कसं पकडलं ? Image Credit source: TV9
पुण्याच्या स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला अखेर 72 तासानंतर पोलिसांनी अटक केली आहे. मध्यरात्रीच्या किर्रर अंधारात पोलिसांनी त्याला अटक केली. दत्ता गावातच असल्याची टिप मिळाली. तो शेताच्या दिशेने गेल्याचं पोलिसांना कळालं आणि पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी सापळा रचला. पोलिसांनी त्याला चारही बाजूने घेरल्याचं सांगितलं आणि शरणागती पत्करण्याचं आवाहन केलं. त्यानंतर गाडेनेही शरणागती पत्करली. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आज त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे.
दत्ता गाडेचा काल दिवसभर पोलिसांनी शोध घेतला. पण तो सापडला नाही. शिरूर येथील गुनाट गावात तो आल्याचं पोलिसांना कळलं होतं. त्यामुळे पोलिसाांनी पोलिसांची 13 पथके तयार केली. त्याला पकडण्यासाठी 100 पोलीस गावात तैनात करण्यात आली होती. तसेच ड्रोनच्या सहाय्याने त्याचा शोधही घेतला जात होता. गावातील उसाच्या शेतात श्वान पथकाच्या सहाय्याने शोध घेतला. पण तो सापडला नाही. मात्र पोलिसांनी आपलं सर्च ऑपरेशन सुरूच ठेवलं.
त्याला सांगितलं बाहेर ये
रात्रीच्या अंधारात गाडे बाहेर येईल असा पोलिसांना अंदाज होता. त्यामुळे पोलिसांनी रात्रीही सर्च ऑपरेशन सुरू ठेवलं. यावेळी अचानक पोलिसांना एक फोन आला आणि गाडे नेमका कोणत्या परिसरात आहे याची माहिती मिळाली. रात्री 11.45 च्या दरम्यान भूक लागली म्हणून दत्ता गाडे एका घरात पाणी पिण्यासाठी गेला. त्या घरातील लोकांनी त्याला पाणी दिलं. पाणी प्यायल्यानंतर तो गेला. तो जाताच त्या घरातील लोकांनी पोलिसांना फोन केला. आणि दत्तात्रय येऊन गेल्याचं सांगितलं.
दोन तास ऑपरेशन
त्यानंतर अर्ध्या तासात पोलिसांनी चारही बाजूंनी नाकेबंदी केली. संपूर्ण उसाचं शेत घेतलं. ड्रोनच्या माध्यमातून त्याला बाहेर येण्याचं आवाहनही केलं. दत्ता गाडे, तू बाहेर ये, तुला चारही बाजूंनी घेरण्यात आलं आहे, असं आवाहन पोलिसांनी केलं. आपला ठावठिकाणा लागला. आता आपलं काही खरं नाही, असं लक्षात आल्यानंतर दत्तात्रय गाडे बाहेर आला. तो कॅनोलच्या खड्ड्यात लपून बसला होता. तो बाहेर आल्यावर पोलिसांनी त्याला तातडीने ताब्यात घेतलं. एका महिलेने पोलिसांना कॉल केला होता. कॉल आल्यानंतर पोलिसांनी दोन तास सर्च ऑपरेशन केलं आणि त्याला ताब्यात घेतलं. रात्री ताब्यात घेतल्यानंतर त्याला लष्कर पोलीस ठाण्यात आणण्यात आलं आहे. सकाळी त्याच्या अटकेची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. आता त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.