अटकेनंतर काय म्हणाला दत्ता गाडे ?Image Credit source: TV9
स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला अखेर तीन दिवसानंतर अटक करण्यात आली आहे. शिरूर येथील गुनाट गावातील एका शेतात तो लपून बसला होता. पोलिसांनी काल रात्री उसाच्या शेतात झाडाझडती करून त्याला अटक केली. आता त्याला कोर्टात सादर करण्यात येणार आहे. पोलीस आयुक्तांनी पत्रकार परिषद घेऊन तीन दिवसातील घटनाक्रमच सांगितला. मात्र, गावकऱ्यांनी या प्रकरणातील आणखी माहिती दिली आहे. अटक केल्यानंतर दत्तात्रय गाडे माझ्याकडून चूक झाली. माझ्याकडून चूक झाली असं म्हणत होता, अशी माहिती समोर आली आहे.
दत्तात्रय गाडेला अटक केल्यानंतर गुनाट गावातील गावकऱ्यांनी याबाबतची माहिती दिली. रात्री त्याला पकडलं. तो इथं अंधारात लपला होता. साहेब, साहेब करून तो बाहेर आला होता. त्यामुळे या आवाजाने आम्ही इथे आलो होतो, असं एका गावकऱ्याने सांगितलं. तर, तो दोन तीन दिवस पोलिसांना चकवा देत होता. त्यानंतर स्वत:हून तो ग्राऊंडवर आला आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं, असं दुसऱ्या गावकऱ्याने सांगितलं.
चार पाच मिनिटाने फोन आला
या गावातील पोलीस पाटलानेही याबाबतची प्रतिक्रिया दिली. पोलीस त्याला शेतातून बाहेर येण्यासाठी आवाहन करत होते. मी पोलीस पाटील असल्याने मला वरिष्ठांनी सांगितल्यानंतर मीही त्याला ड्रोनच्या माध्यमातून आवाज दिला. माझ्या नंतर शिरूर पोलिसांच्या जाधव साहेबांनीही आवाज दिला. त्याला पकडल्यानंतर चार पाच मिनिटाने मला पोलिसांचा फोन आला. त्याला पकडलंय. पण त्याला तुमच्याशी बोलायचं आहे, असं पोलिसांनी सांगितलं. त्यामुळे आम्ही इथे आलो. त्याचं आणि माझं बोलणं झालं. तो म्हणाला पाटील तुम्ही इकडे या. जाधव साहेबांना घेऊन या. आम्ही येईपर्यंत स्वारगेट पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं, असं पोलीस पाटील म्हणाले.
माझ्या मुलाला जपा…
माझ्या मुलाला जपा. माझ्या मुलाकडे लक्ष द्या. माझ्याकडून चूक झाली. माझ्याकडून चूक झाली, असं तो सांगत होता, असं पोलिस पाटील म्हणाले. तर, दुसऱ्या गावकऱ्यानेही प्रतिक्रिया व्यक्त करताना, माझ्यासमोर तो काही बोलला नाही. पण दुसऱ्या व्यक्तीकडे तो बोलला. माझ्याकडून चूक झाली ती झाली. पण आता माझ्या मुलाला जपा. त्यांच्याकडे लक्ष द्या, असं तो म्हणत होता, असं या गावकऱ्याने सांगितलं.