भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतली. धनंजय मुंडे यांच्या डोळ्याचे ऑपरेशन झाल्यानं त्यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी सुरेश धस यांनी मुंडेंची भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. या भेटीची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असताना त्यांनी जोरदार फटकेबाजी केली. त्यांनी पत्रकारांनाच सुनावलं.
नेमकं काय म्हणाले अजित पवार?
धस आणि मुंडे यांच्या भेटीबाबत प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारालाच अजित पवार यांनी सुनावलं आहे. ‘तुला काय वाईट वाटतं. एक मंत्री आहेत एक आमदार आहेत. यशवंतराव चव्हाण साहेबांनी आपल्याला सुसंस्कृतपणा शिकवला आहे, समजलं. दादा आणि मी एकमेकांच्या विरोधात होतो. पण आम्ही भेटायचो बोलायचो. आमची काय दुष्मनी नाहीये, आमची त्यावेळी विचारधारा वेगळी होती. आज आमची विचारधारा जुळलेली आहे. त्यापद्धतीनं आम्ही पुढे चाललो आहेत. त्याच्यामुळे त्यांचे पूर्वीपासूनच संबंध आहेत. समजा तुम्ही जर आजारी पडलात आणि जर तुमचे एखाद्या व्यक्तीसोबत जमत नसेल, पण तो तुमची विचारपासून करण्यासाठी आला तर त्याच काही चुकीचं आहे का? असा सवाल अजित पवार यांनी यावेळी केला.
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. संतोष देशमुख यांची हत्या अत्यंत क्रूरपणे झालेली आहे. कोणालाही त्याचं वाईट वाटणारच. त्यांची पत्नी असेल दोन लहान मुलं असतील, बंधू असतील त्यांचं कुटुंब असेल. त्या सगळ्यांच्या मनामध्ये ही भावना येणं साहाजिक आहे. त्यामुळे त्यांच्या मागण्या योग्यच आहेत.
आमचा प्रयत्न आहे, की न्यायालयीन चौकशी, सीआयडी, एसआयटी यांच्याकडून या प्रकरणातील रिपोर्ट लवकरात लवकर यावेत, मुख्यमंत्री सांगतायेत मी पण सांगतोय, या प्रकरणात कोणीही दोषी असेल, त्यांची कोणाचीच गय केली जाणार नाही, ज्याच्या पर्यंत धागेदोरे पोहोचतील त्यांना कडक शासन केलं जाईल, वेळ लागतो तपासाला वेळ लागतो. आज साठ दिवस झाले पण त्यातील एक व्यक्ती अजूनही सापडत नाही, असं होत नाही पण दुर्दैवानं तो सापडत नाही, त्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.