मोठी बातमी समोर येत आहे, पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार सुरेश धस यांच्यामध्ये जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. सुरेश धस यांनी पुन्हा एकदा जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. मी संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्यामध्ये भेदभाव करत नाही. लाँग मार्च निघाल्यापासून गेल्या 25 दिवसांमध्ये आव्हाडांनी एकदा तरी संर्पक केला आहे का? असा सवाल सुरेश धस यांनी उपस्थित केला आहे.
नेमकं काय म्हणाले सुरेश धस?
मी संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्यामध्ये भेदभाव करत नाही. लाँग मार्च निघाल्यापासून गेल्या 25 दिवसांमध्ये आव्हाडांनी एकदा तरी संर्पक केला आहे का? जटील प्रश्नांमधून मार्ग काढण्यासाठी मी प्रयत्न केला, ती जर जूक असेल तर ती चूक मी केली. ज्या चिमुकलीवर बलात्कार झाला त्या आरोपीची वाह वाह करणारे तुम्ही आहात, अक्षय शिंदेंची वाह वाह करणारे कोणत्या मानसिकतेचे आहेत? असा हल्लाबोल सुरेश धस यांनी केला आहे.
पंकजा मुंडेंना टोला
भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी मोठं वक्तव्य केलं होतं. मला आष्टीवर जास्त प्रेम करावं लागेल, कारण परळी तिकडे राष्ट्रवादीला गेला आहे. मात्र हा मतदारसंघ आता भाजपकडे आहे, असं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता सुरेश धस यांनी देखील या वक्तव्यावर जोरदार पलटवार केला आहे. तिकडे सगळं हायजॅक झालं आहे, त्यामुळे आधी पंकजा मुंडे यांनी आपल्या मतदारसंघात लक्ष द्यावं असं सुरेश धस यांनी म्हटलं आहे.
दरम्यान दुसरीकडे अंजली दमानिया यांनी देखील सुरेश धस यांच्यावर आरोप केले होते. सुरेश धश यांनी युटर्न का घेतला? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. मात्र यावर बोलणं धस यांनी टाळलं आहे. दमानिया आणि अंधारे या माझ्या भगिनी आहेत, त्यामुळे मी त्यांचा आदर करतो असं धस यांनी म्हटलं आहे. दरम्यान आता आव्हाड धस यांना काय प्रत्युत्तर देणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.