सुप्रिया सुळेंची बोलकी प्रतिक्रियाImage Credit source: गुगल
राज्यातील ज्येष्ठे नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बैठकांचा धडाका सुरू आहे. विविध कामाच्या निमित्त या बैठकी आणि भेटी होत आहे. यापूर्वी सुद्धा दोन्ही नेत्यांमध्ये भेटी झाल्या होत्या. आताही त्यांच्यात बैठकी झाल्यानंतर चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येतील का? या प्रश्नावर खासदार सुप्रिया सुळे यांनी असे उत्तर दिले.
सोमवारी दोन्ही नेत्यांमध्ये बैठक
सोमवारी शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये पुणे येथे एक बैठक झाली. या बैठकीत दोन्ही नेत्यांमध्ये साखर उद्योगाविषयी चर्चा झाली. ऊस शेती आणि साखर उद्योगात कृत्रिम बुद्धिमता (AI) सारख्या नवीन तंत्रज्ञानाचा वापरावर चर्चा झाली. या बैठकीनंतर आज खासदार सुप्रिया सुळे यांना या भेटीविषयी विचारले असता, कामाच्या निमित्ताने अशा भेटी होत असतात असे उत्तर त्यांनी दिले.
दोन्ही गट एकत्र येतील?
राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येतील का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला असता, त्यांनी या प्रश्नाला बगल दिली. राज्यात गुन्हेगारी वाढल्याबाबत आपण अनेक दिवसांपासून मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधत असल्याचे ते म्हणाले. राज्यात पाण्याची समस्या वाढली आहे. याविषयी मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी असे आवाहन त्यांनी केले. राज्यातील समस्या सोडवण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करायला हवेत, असे त्या म्हणाल्या.
अजितदादांची बोलकी प्रतिक्रिया
शरद पवार आणि अजित पवार हे गेल्या पंधरा दिवसात तीनदा एकत्र आले. आजही दोन्ही नेते साखर संकुलाच्या बैठकीनिमित्ताने भेटले. या भेटीवर दादांनी प्रतिक्रिया दिली आहे. कुटुंबात साखरपुड्याचा कार्यक्रम होता, कुटुंब म्हणून एकत्र येतात ही महाराष्ट्राची संस्कृती आहे, परंपरा वर्षानुवर्षे चालत आली आहे. त्यामध्ये बाकीच्यांनी फार चर्चा करण्याचे कारण नाही. तो पवार परिवाराचा अंतर्गत प्रश्न असल्याचे दादा म्हणाले. तर शरद पवार ज्या संस्थेमध्ये अध्यक्ष आहेत, त्यात आपण सदस्य म्हणून काम करतो. रयत शिक्षण संस्थेत एआयचा कसा वापर करता येऊ शकतो, याविषयाची चर्चा झाल्याचे ते म्हणाले. राजकारणा पलिकडे पण पाहायचं असते, प्रत्येक गोष्टीत राजकारण आणायचं नसतं, असे दादा म्हणाले.