राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. एसटी कर्मचाऱ्यांना पूर्ण पगावर मिळाला नाही, यावरून वातावरण चांगलंच तापलं आहे, विरोधकांकडून सरकारच्या कोंडीचा प्रयत्न सुरू आहे. यावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे यांनी जोरदार टोला लगावला आहे, एकमेकांवर ढकलण्यापेक्षा सरकार म्हणून काय निर्णय घ्यायचा हे त्यांनी आपापसात ठरवलं पाहिजे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
एकमेकांवर ढकलण्यापेक्षा, सरकार म्हणून काय निर्णय घ्यायचा हे त्यांनी आपाआपसात ठरवलं पाहिजे. मी त्यांच्याकडे सरकार म्हणून बघत आहे. महाराष्ट्र सरकारमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचऱ्यांचा हक्काचा पगार वेळेवर मिळाला पाहिजे. जेव्हा निवडणूक झाली त्या काळातील माझी भाषण काढा, सरकारमध्ये येणारे पैसे आणि खर्च होणारे पैसे याची तफावत आम्हाला दिसत होती. हे होणारच होतं, त्यामध्ये काही आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट नाही, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रकरणावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. त्या महिलेची हत्या झाली असा माझा आरोप आहे, एक महिला साडेपाच तास कळा देत होती, तिचा रक्तस्त्राव झाला. अशावेळी जर तुम्ही तिला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये पाठवलं, तर ती हत्या नाही का? जर त्या महिलेला तिथेच ट्रीटमेंट देण्यात आली असती, तर ती माऊली आज आपल्यामध्ये असती. जेवढी जबाबदारी तिथल्या डॉक्टरची आहे, तेवढीच जबाबदारी तिथल्या हॉस्पिटलची सुद्धा आहे. हॉस्पिटलला यातून वेगळं करता येणार नाही, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मंगशकर कुटुंबीयांवर टीका केली होती. यावर प्रतिक्रिया देताना मी कुठल्याही कुटुंबाला नाव ठेवणार नाही, व्यक्तीमध्ये अडकायला नको, हॉस्पिटल आणि डॉक्टर जे कोणी पाच दहा लोक त्यामध्ये इन्व्हॉल असतील त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे ही आमची आग्रहाची भूमिका असल्याचं यावेळी सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.