सुप्रिया सुळेंचा इंदू मिल स्मारकावरुन निशाणा, म्हणाल्या  फार रेंगाळत…

Dr. Babasaheb Ambedkar Statue

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मुंबईतील इंदू मिल परिसरात स्मारक बांधण्यात येत आहे. या स्मारकात डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची 450 फूट असणार आहे. इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची पायाभरणी सप्टेंबर 2020 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आली होती. नुकतंच या भव्य स्मारकाचा एमएमआरडीएचे आयुक्त डॉ.संजय मुखर्जी आणि अतिरिक्त आयुक्त विक्रम कुमार यांनी आढावा घेतला. यावेळी त्यांनी इंदू मिल परिसरातील स्मारकाचे बांधकाम 60 ते 70 टक्के पूर्ण झाल्याची माहिती दिली आहे. आता यावरुन खासदार सुप्रिया सुळे यांनी निशाणा साधला आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना इंदू मिलमधील आंबेडकरांच्या स्मारकाबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी सरकारवर टीका केली.

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

“इंदू मिल स्मारकाबद्दल मी अनेकवेळा बोलले आहे. शरद पवार साहेबांनी देखील याचा खूप पाठपुरावा केला. पण आता त्या गोष्टीला 3 ते 4 वर्ष झाली आहेत. सरकारकडून ज्या गतीने हे काम पूर्ण व्हायला हवं होतं, ते आतापर्यंत झालेले नाही, हे दुर्दैव आहे. माझी सरकारला विनम्र विनंती आहे की हे काम तातडीने चांगल्या दर्जाचं झालं पाहिजे. खूप वर्ष झाली, हे काम फार रेंगाळत आहे आणि दुर्दैव आहे की अशा कामात जी प्रगती अपेक्षित होती ती झालेली नाही”, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

प्रस्तावित स्मारकाची वैशिष्ट्यं

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा: हे स्मारकाचे केंद्रस्थान असेल. जमिनीपासून याची एकूण उंची 106 मीटर असेल, ज्यात 30 मीटरचा चौथरा आणि त्यावर 76.68 मीटर (250 फूट) उंचीचा पुतळा असेल.
  • बौद्ध वास्तुकलेचा प्रभाव: या स्मारकात बौद्ध शैलीतील घुमट आणि स्तूपांचा समावेश असेल. यासोबतच एक संग्रहालय आणि प्रदर्शनांसाठी विशेष दालन असेल.
  • परिसर आणि सुविधा: पुतळ्याच्या भोवती 6 मीटर लांबीचा गोलाकार मार्ग असेल. चौथऱ्यावर जाण्यासाठी लिफ्टची व्यवस्था करण्यात येईल.
  • सांस्कृतिक आणि सार्वजनिक उपक्रम: एक आधुनिक प्रेक्षागृह असेल, ज्यात एका वेळी 1000 लोक बसू शकतील. याचा उपयोग सांस्कृतिक कार्यक्रम आणि सार्वजनिक सभांसाठी केला जाईल.
  • ध्यानधारणा केंद्र: विपश्यना साधकांसाठी येथे ध्यान करण्यासाठी विशेष केंद्र असेल.
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र आणि ग्रंथालय: या केंद्रात एक मोठे ग्रंथालय असेल, ज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील पुस्तके, त्यांचे लेखन, चरित्र, माहितीपट, लेख आणि त्यांच्या सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक कार्यांवरील संशोधनात्मक साहित्य उपलब्ध असेल.
  • शैक्षणिक सुविधा: संशोधन केंद्रात व्याख्याने आणि कार्यशाळा घेण्यासाठी 400 लोकांची क्षमता असलेले एक सभागृह असेल.
(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)