पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातील श्री क्षेत्र बनेश्वर येथील रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. या रस्त्यासाठी आज खासदार सुप्रिया सुळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भर उन्हात उपोषण केलं. काही वेळानंतर हे उपोषण मागे घेण्यात आलं, यावरून आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाव न घेता सुप्रिया सुळे यांना टोला लगावला आहे.
नेमकं काय म्हणाले अजित पवार?
पुण्यामधल्या रस्त्यासाठी उपोषणाला बसलेल्या सुप्रिया सुळे स्टंटबाजी करतात का? असा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारला असता नो कॉमेंट्स म्हणत अजित पवार यांनी यावर उत्तर देणं टाळलं. पण त्याच वेळेस हा रस्ता अवघा 600 मीटरचा आहे आणि रस्ता व्हावा ही इच्छाच असेल तर तो खासदार निधीतून करता येऊ शकतो असं म्हणत त्यांनी यावेळी अप्रत्यक्षरीत्या सुप्रिया सुळे यांना टोला देखील लगावला आहे. पिंपरीमध्ये विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या नागरी सत्कारासाठी आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
दरम्यान गर्भवती महिला मृत्यू प्रकरणात डॉ. घैसास यांनी राजीनामा दिला असला तरी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे? या प्रकरणात काय कारवाई करणार असं विचारलं असता अजित पवार यांनी याबाबत चौकशी अहवाल आल्यानंतर त्याबाबत निर्णय होईल असं स्पष्टीकरण दिलं. कधीकधी आरोप झाल्यानंतरही राजीनामा द्यावा लागतो पण चौकशीनंतरच कारवाई होईल असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान बीडच्या आवादा कंपनीमध्ये चोरी झाल्याची तक्रार आली आहे, त्याबाबत चौकशी होऊन कारवाई केली जाईल, योग्य ती सुरक्षा देखील देणार असेही अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. पुणे मेट्रो पिंपरी चिंचवड शहराला वळसा मारुन चाकण पर्यंत घेऊन जाणार आहोत. रिंग रोडचं काम ही हातात घेतोय, ज्यांच्या जमिनी जातील, त्यांना टीडीआर देण्याचा हेतू आहे, असंही यावेळी अजित पवार यांनी म्हटलं आहे.