बारामती लोकसभा मतदारसंघातून दणदणीत मताधिक्याने विजय मिळविल्यावर सुप्रिया सुळे प्रथमच पुण्यातील मार्केट यार्ड येथे आल्या. ‘दादांना सांगा, ताई आली’, ‘वहिनींना सांगा, ताई आली,’ अशी घोषणाबाजी करून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गुलाल व फुले उधळून त्यांचे जल्लोषात स्वागत केले. त्यानंतर निसर्ग कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
‘राज्यात महागाई, दुष्काळ, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार अशी मोठी आव्हाने समोर आहेत. अनेक ठिकाणी दुष्काळ छावण्यांची मागणी असूनही ती मान्य झालेली नाही; तसेच चारा डेपो व पाण्याचे टँकरही वेळेवर पोहोचत नाहीत. त्यामुळे जनता त्रस्त झाली असून, महाविकास आघाडीच्या कामाची जबाबदारी वाढली आहे. दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी विजयाचा जल्लोष करण्यापेक्षा चारा छावणी, पाण्याचे टँकर व दुष्काळ निवारणासाठी मदत करावी,’ असे आवाहनही त्यांनी केले.
‘ज्येष्ठांना सल्ला द्यायचा नसतो’
‘उपमुख्यमंत्री अजित पवारांना काय सल्ला देणार,’ या प्रश्नावर ‘अजित पवार हे माझ्यापेक्षा मोठे असून, लहानांनी ज्येष्ठांना सल्ला द्यायचा नसतो, तर त्यांच्याकडून घ्यायचा असतो,’ असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. ‘माझी लढाई ही कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात नसून, ती कायमच वैचारिक असते,’ असेही त्यांनी नमूद केले. ‘विजयानंतर शुभेच्छांसाठी सुनेत्रा पवार यांचा फोन आला का,’ या प्रश्नावर ‘सुनेत्रा पवार या वयाने, नात्याने आणि पदाने माझ्यापेक्षा मोठ्या आहेत. त्यांच्याबद्दल माझ्या मनात नेहमी प्रेम आणि आदरच राहील; तसेच पार्थ आणि जय मला मुलासारखेच आहेत,’ असे सुळे म्हणाल्या.
‘धंगेकरांची भूमिका महत्त्वाची’
‘रवींद्र धंगेकर उमदे लोकप्रतिनिधी असून, त्यांना तिकीट जाहीर करण्यात विलंब झाल्याने प्रचाराला कमी वेळ मिळाला; परंतु राजकारणात जय-पराजय होत असतो. कल्याणीनगर अपघात प्रकरणात धंगेकर सर्वसामान्यांसोबत उभे असून, त्यामुळेच आरोपींवर कारवाई झाली आहे,’ असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
सुप्रिया सुळे म्हणाल्या…
– ‘मॅजिक नंबर’ नसल्याने सरकार स्थापनेसाठी सध्यातरी ‘वेट अँड वॉच’.
– विरोधकांचा रडीचा डाव व पिपाणी चिन्हामुळे मतदार संभ्रमात; अन्यथा सातारा, दिंडोरीची जागाही आमच्या वाट्याला.
– बीड लोकसभा मतदारसंघात जातींचे राजकारण झाल्याचे मान्य नाही.