सुनील तटकरे यांचे नेते अजित पवार नाही तर…, संजय राऊत यांचा मोठा दावा

Sanjay Raut : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शनिवारी १२ एप्रिल रोजी किल्ले रायगडवर येत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 345 व्या पुण्यतिथी निमित्त अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत. त्यानिमित्त अमित शाह खासदार सुनील तटकरे यांच्या गीता बाग येथील निवासस्थानी भोजनाचा आस्वाद घेणार आहेत. त्यावरुन शिवसेना उबाठा खासदार संजय राऊत यांनी सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. सुनील तटकरे यांचे नेते अजित पवार नाही तर अमित शाह असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

संजय राऊत म्हणाले, सुनील तटकरे यांचे नेते अजित पवार नाही. त्यांचे नेते अमित शाह आहेत. एकनाथ शिंदे यांचे नेते अमित शाह आहेत. अमित शाह नसते तर हा पक्षच फुटला नसता. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राहिली नाही. देवेंद्र फडणवीस यांना आपण गृहमंत्री असल्याचे माहीत नाही. रोज नागपूर, मुंबई आणि राज्यात महिलांवर अत्याचार होत आहे. त्यानंतर गृहमंत्री कुठे दिसत नाही, अशी टीका राऊत यांनी केली.

तहव्वूर राणा प्रकरणात बोलताना राऊत म्हणाले, राणाला भारतात आणण्यासाठी २००९ पासून कायदेशीर प्रक्रिया सुरु आहे. आता त्याचे क्रेडीट घेतले जाईल. मग त्याला बिहार निवडणुकी दरम्यान फाशीची शिक्षा दिली जाईल. निवडणुकांसाठी भाजप काही करु शकते. राणाला भारतात आणणे हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुटनीतीचे यश आहे, असे मत केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी व्यक्त केले होते. त्याला राऊत यांनी उत्तर दिले.

संजय राऊत यांनी राणा यांच्या प्रत्यार्पण झाल्यानंतर देशातील आर्थिक घोटाळ्यांमध्ये आरोपी असलेले नीरव मोदी आणि मेहुल चौकसी यांना भारतात आणण्याची मागणी केली. केवळ राणासारख्या एकाला भारतात आणून मोठा विजय असल्याचे दाखवू नये. त्याला भारतात आणण्याचे श्रेय तत्कालीन सरकारचे आहे. त्याकाळात ही प्रक्रिया सुरु झाली होती, असे राऊत यांनी म्हटले.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)