Sunil Tatkare : छगन भुजबळांना निर्णय प्रक्रियेत डावलण्याच्या मुद्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटलं….

छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज आहेत. ही नाराजी मंत्रिपदासाठी नाही, तर जी वागणूक मिळाली त्याची आहे असं छगन भुजबळ म्हणाले. छगन भुजबळ यांनी अनेक पक्ष विरोधी वक्तव्य केली आहेत. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे बोलले आहेत. “भुजबळ साहेब भुजबळ साहेब आहेत. त्यांना त्यांच्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे. जेव्हा गाठीभेटी होतील, तेव्हा बोलू. समीर आणि पंकज भुजबळ यांच्याशी दोन दिवसापासून चर्चा सुरू आहे. दोन दिवसात प्रकरणावर पडदा पडेल. योग्यवेळी आम्ही त्यांना भेटू. संसद आणि नागपूरचं अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे कसं भेटता येईल याचा प्रयत्न करू” असं सुनील तटकरे यांनी सांगितलं.

“सुरुवातीच्या काळात त्यांची पटेलांशी चर्चा झाली होती. अनेक विषयावर चर्चा होत असते. लोकसभेच्या वेळी राष्ट्रवादीला मर्यादित जागा मिळाल्या. भुजबळांना नाशिकमधून लोकसभेला उभं करण्याचं दिल्लीच्या बैठकीत ठरलं. भुजबळांनी मान्य केलं. पण उमेदवारी घोषित करण्यात उशीर झाला. मी त्यावर खुलासा केला. नंतर भुजबळांनी नंतर लढणार नसल्याचं सांगितलं. लोकसभेत जागा वाटप उशीरा झालं. त्यामुळे जागा वाटप जाहीर करण्यात उशीर झाला, त्यावेळी कमी जागा मिळाल्या. विधानसभेत आम्ही जास्त जागा जिंकलो. त्यावेळी जे घडलं ते नाकारता येत नाही” असं सुनील तटकरे म्हणाले.

निर्णय प्रक्रियेत भुजबळ यांना डावललं का?

“ज्या ज्यावेळी पक्षाच्या माध्यमातून काही निर्णय घेण्याची वेळ आली तेव्हा भुजबळ होते. विधानसभेला आमदार आमच्यासोबत होते. नाशिकमध्ये हिरामण खोसकर, माणिकराव कोकाटे, नितीन पवार, सरोज आहेर विद्यमान आमदार होते यांच्याबाबत भुजबळांशी चर्चा केली. ते ज्येष्ठ नेते आहेत. इतरही नेते आहेत. प्रतापराव चिखलीकर शेवटच्या टप्प्यात आले. लोह्याची जागा आली. अपक्ष आमच्यासोबत होते. विदर्भातील जागा आहे. भुजबळ ही त्यांच्या मतदारसंघात ते वातावरण झाले होते त्यामुळे त्यांच्या मतदारसंघात होते. नवीन चेहरे शिरूर, भोर आणि वेल्ह्यातून आले” असं सुनील तटकरे म्हणाले.

‘राऊत यांना काम उरलं नाही’

“संजय राऊत यांची रोजची भूमिका बदलते. या भुजबळांबद्दल राऊत काय म्हणाले हे दीड वर्षातील पाहिलं तर त्यांची जहरी टीका पाहायला मिळेल. राऊत यांना काम उरलं नाही. त्यांना जनतेने जागा दाखवली आहे. त्यांच्या वक्तव्याला गंभीर घेण्याची भूमिका नाही. सामना म्हणजे संजय राऊत. त्यांना असं लिहिण्याशिवाय काही राहिलं नाही. निवडणुकीनंतर मनस्वास्थ बिघडलेली माणसं काय लिहितील. त्यांनी चांगलं लिहिलं तर त्यांना संजय राऊत कसं म्हणता येईल. ते संजय राऊत आहेत” अशा शब्दात सुनील तटकरेंनी संजय राऊत यांचा समाचार घेतला.

अर्थ खात्यासाठी अजितदादा आग्रही का?

अर्थ खात्यासाठी अजितदादा आग्रही आहेत, यावर सुनील तटकरे यांनी हे सर्व कल्पोकल्पित आणि निराधार आहे असं म्हटलं. “केवळ तब्येतीच्या कारणामुळे अजितदादा भेटले नाही. ते नागपूरलाच होते. ते दिल्लीला आले नाही. ते नागपूरलाच घरी आराम करत होते. तब्येतीच्या कारणामुळे ते विधानसभेत आले नाही. मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री अर्थ खात्याचं ठरवतील. खातेवाटपात कोणतीही नाराजी नाही” असं त्यांनी स्पष्ट केलं.

उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटीवर भूमिका काय?

“उद्धव ठाकरे एका पक्षाचे प्रमुख आहेत. मुख्यमंत्र्यांना भेटणं हा त्यांचा व्यक्तीगत अधिकार आहे. त्यावर मला टिप्पणी करण्याचा अधिकार नाही. एकमेकांना शुभेच्छा देणं यात काही राजकारण आहे, असं वाटत नाही” असं सुनील तटकरे म्हणाले.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)