उन्हाळा सुरू झाला की शाळेच्या सुट्ट्या त्याचबरोबर ऑफिसच्या सुट्ट्या यामुळे प्रत्येकजण उन्हाळ्याच्या सुट्टीतील आंनद द्विगुणीत करण्यासाठी बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करतात. जवळजवळ प्रत्येकालाच असे वाटते की हा उन्हाळा काहीतरी खास आणि संस्मरणीय असावा. गर्दी, रहदारी आणि आवाजापासून दूर, एखाद्या शांत आणि सुंदर ठिकाणी वेळ घालवला पाहिजे. जर तुम्हीही अशा ठिकाणाच्या शोधात असाल, तर भारताचा ईशान्य भाग तुमच्यासाठी एक परिपूर्ण ठिकाण असू शकते.
ईशान्य भारताचा हा भाग असा आहे, ज्याला अनेकदा हिडन पॅराडाईस म्हटले जाते. याचा अर्थ एक लपलेले स्वर्ग. येथील हिरवळ, पर्वत, धबधबे, ढगांनी झाकलेले दऱ्या, स्थानिक संस्कृती आणि शांत वातावरण हृदयस्पर्शी आहे. जर तुम्हाला नवीन ठिकाण एक्सप्लोर करायचे असेल तर आम्ही तुमच्यासाठी काही सर्वोत्तम ठिकाणे घेऊन आलो आहोत. चला तर मग त्याबद्दल जाणून घेऊयात…
गंगटोक
गंगटोक हे असे ठिकाण आहे, जे तेथील शांत दऱ्या, तिबेटी संस्कृती आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखले जाते. येथे तुम्हाला त्सोंगमो तलाव, नाथुला खिंड, रूप्वेमधून हिरवेगार पर्वत दिसतात. जर तुम्ही इथे फिरायला गेलात तर तुम्हाला याकवर राइडिंग, स्थानिक बाजारातून खरेदी आणि मठांमध्ये ध्यान करून एक वेगळा अनुभव घेता येईल.
शिलाँग
ढगांनी वेढलेले शिलाँग हे धबधबे, दऱ्या आणि संगीत संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे. उमियम लेक, एलिफंट फॉल्स, शिलाँग पीक हे येथे पाहण्यासारखे ठिकाण आहेत. जर तुम्ही इथे गेलात तर स्थानिक बँडचे लाईव्ह संगीत ऐका, स्थानिक जेवणाचा आस्वाद घ्या आणि शांततेचे क्षण या ठिकाणी घालवा.
तवांग
तवांग हे एक अतिशय सुंदर ठिकाण आहे जे उन्हाळ्याच्या सुट्ट्या घालवण्यासाठी योग्य आहे. बर्फाळ डोंगर, मठ आणि निळे आकाश यांच्यामध्ये वसलेले हे छोटे शहर मनाला शांत करणारे ठिकाण आहे. येथे तुम्ही तवांग मठ म्हणजे भारतातील सर्वात मोठा बौद्ध मठ, बुम ला पास एक्सप्लोर करू शकता. तुम्ही येथे ध्यान आणि हायकिंग देखील करू शकता.
जोरहाट
जोरहाट येथील शांत वातावरण, तेथील निसर्ग आणि हिरवळ त्यासोबतच त्या ठिकाणचा इतिहास प्रवाशांसाठी खास बनतो. जर तुम्हाला इतिहासात रस असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठी योग्य आहे. येथे जगातील सर्वात मोठे नदीचे माजुली बेट आहे. या ठिकाणी तुम्हाला एक सुंदर चहाचे मळे देखील पाहायला मिळतील. इथे आलात तर बोटिंगचा आनंद घ्या. स्थानिक हस्तकला पहा आणि चहाच्या बागांना भेट द्या.
ऐझॉल
ऐझॉल येथील डोंगराळ रस्त्यांमध्ये आणि शांत वातावरणात वेळ घालवणे एखाद्या थेरपीसारखे वाटते. येथे भेट देण्यासाठी डर्टलांग हिल्स, मिझोरम राज्य संग्रहालय, रीक गाव आहे. येथील स्थानिक पारंपारिक नृत्याचा आनंद घेऊन तेथील गावाचा साधेपण असलेल्या संस्कृतीचा अनुभव घ्या.