थोरातांना बालेकिल्ल्यात टक्कर देण्याचे सुजय विखेंचे  संकेत
शिर्डी : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का बसल्यानंतर भाजप नेते आणि अहमदनगरचे माजी खासदार सुजय विखे यांनी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने हालचाली सुरु केल्या आहेत. संगमनेर विधानसभा मतदारसंघातून सुजय विखे रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आगामी विधानसभेत विखे विरुद्ध थोरात असा रंगतदार सामना होणार का? याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.अहमदनगर जिल्ह्यातील राजकारणात विखे आणि थोरात या दोन बड्या राजकीय प्रस्थांमधील विळ्या-भोपळ्याचं नातं सर्वश्रुत आहे. काँग्रेसमध्ये एकत्र असतानाही एकाच जिल्ह्यातील या दोन दिग्गज नेत्यांमध्ये विस्तव जात नव्हता. यथावकाश विखेंनी काँग्रेसचा हात सोडला आणि भाजपचा झेंडा हाती घेतला. त्यानंतर तर दोघांमधील कलगीतुरा अधिकच उठावदार पद्धतीने रंगू लागला.

संगमनेर विधानसभा मतदारसंघावर बाळासाहेब थोरात यांचं एकहाती वर्चस्व आहे. १९८५ पासून २०१९ पर्यंत असे सलग आठ वेळा ते संगमनेर मतदारसंघातून निवडून आले आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी महसूल मंत्रालयाची धुराही सांभाळली होती. त्यामुळे थोरातांच्या साम्राज्याला खालसा करणं तितकसं सोपं नसेल. मग ते विखे असले तरीही.
माजी खासदार सुजय विखे यांनी विधानसभा लढवण्याची तयारी दर्शवली आहे. त्यांनी पक्षाकडे तशी इच्छा व्यक्त केल्याची माहिती आहे. सुजय हे संगमनेर किंवा राहुरी विधानसभा लढवण्यास इच्छुक आहेत. जनतेने ठरवल्यास निवडणूक लढवण्यास तयार असल्याचं सुजय विखे म्हणाले.

संगमनेर विधानसभेत बाळासाहेब थोरात आमदार असल्यामुळे थोरात विरूद्ध विखे लढत होणार का? यावर चर्चा सुरू झाली आहे. तर राहुरी विधानसभा लढवल्यास प्राजक्त तनपुरे विरूद्ध सुजय विखे असा सामना होऊ शकतो. सुजय विखे यांनी पत्रकार परिषदेत यासंदर्भात सुतोवाच केले.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुजय विखेंना पराभवाची धूळ चारण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार आणि माजी आमदार नीलेश लंके यांनी विखेंना पराभूत करत संसद गाठली. त्यानंतर सुजय विखे विधानसभेला नशीब आजमावण्याची शक्यता आहे.